मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:17 IST2025-10-13T18:16:39+5:302025-10-13T18:17:27+5:30
Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
सर्वात मोठी महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आता सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. दरम्यान, यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुंबईत महाविकास आघाडीमधून किंवा ठाकरे बंधूंसोबत न लढता काँग्रेसने स्वबळावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषकरून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाच्या एकजुटीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे संकेत मिळत होते. तसेच आता त्या दिशेने पावलं पडत असल्याने दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचं काय होणार आणि मुंबई महानगरपालिका विभागात आपली ताकद राखून असलेल्या काँग्रेसला या आघाडीत स्थान मिळणार का असा प्रश्न विचारला जात होता.
त्यात काँग्रेसही आपल्यासोबत असावी, अशी राज ठाकरेंची इच्छा असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र त्याबाबत मनसेकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली होती. दरम्यान, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत मुंबईमध्ये स्वतंत्र आणि स्वबळावर लढावं, अशी मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केल्याची आणि आपल्या भावना काँग्रेसच्या हायकमांडकडे पोहोचवल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.