Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:03 IST2026-01-14T18:01:17+5:302026-01-14T18:03:02+5:30
MNS Bala Nandgaonkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याच दरम्यान फेसबुकवरून एक भावुक पोस्ट केली आहे.

Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत यावेळी भाजपा-शिंदे सेना महायुती विरुद्ध उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी मुख्य लढत होत आहे. या लढतीत मुंबईतील मराठी माणूस, मराठी अस्मिता, विकास, उद्योगांचं अदानींकडे झालेलं केंद्रीकरण हे मुद्दे चर्चेच राहिले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याच दरम्यान फेसबुकवरून एक भावुक पोस्ट केली आहे. "यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही. रात्र वैऱ्याची आहे पण या अंधार रात्री नंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे तुम्हीही पुढे या" असं म्हटलं आहे.
"रात्र वैऱ्याची आहे, आता तरी जागा हो. उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदान करताना फक्त २ मिनिटं शांत चित्ताने विचार करा की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. यावेळी मराठी माणूस चुकला तर मग पुन्हा संधी नाही. ठाकरेंना जर सत्तेसाठी एकत्र यायचे असते तर ते कधीच आले असते. पण केवळ आपल्या माय मराठीसाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी ही लढाई किती महत्त्वाची आहे हे जाणून ते नेक इराद्याने एक आले आहे."
"समोरील विरोधक बलाढ्य, धनदांडगे, सत्ताधारी असले तरी आपण एकीने, ठाकरेंच्या बरोबरीने लढलो तर आपण त्यांना हरवू शकतो. माझ्या एका मताने काय होईल असा विचार न करता मी अजून किती जणांना सांगू शकतो ते बघा आणि सर्व ताकद आपल्या माणसांसाठी लावा. ही विनंती केवळ मुंबईतील नागरिकांना नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना आहे. रात्र वैऱ्याची आहे पण या अंधार रात्री नंतर जी आशेची किरण घेऊन येणारी सकाळ आहे ती सोनेरी आहे. मी महाराष्ट्रासाठी खारीचा वाटा उचलत आहे तुम्हीही पुढे या" असं बाळा नांदगावकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.