मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 07:02 IST2025-08-19T07:02:17+5:302025-08-19T07:02:49+5:30
भाडेतत्त्वावरील बेस्ट बसमुळे झालेला हा सलग दुसरा प्राणघातक अपघात आहे

मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुसळधार पावसात सोमवारी दुपारी वडाळा चर्च परिसरात टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या मायलेकरांना बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. अपघातातील मृतांची नावे लिओबो सेल्वराज (३८) आणि अँथनी सेल्वराज (८) अशी आहेत. गेल्याच आठवड्यात मलबार हिल येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा बसने चिरडल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरचा भाडेतत्त्वावरील बेस्ट बसमुळे झालेला हा सलग दुसरा प्राणघातक अपघात आहे.
बसमार्ग क्रमांक १७४ ही आणिक आगाराची बस (डागा ग्रुप) भाडेतत्त्वावरील बस आहे. ती दुपारी साडेतीनच्या सुमारास वीर कोतवाल उद्यान येथून भरणी नाका भागात जात होती. वडाळा चर्च बसस्टॉपजवळ लिओबो आणि त्यांचा मुलगा अँथनी हे टॅक्सीची वाट बघत होते. त्याचवेळी भरधाव बसने त्यांना धडक दिली. याप्रकरणी बसचालक बाबू शिवाजी नागेनपेणे (४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बसचा ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.