मुंबई इन मिनिट्स’ स्वप्न प्रत्यक्षात येणार; मेट्रोच्या जाळ्यामुळे प्रवास सुपरफास्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:16 AM2021-05-30T07:16:02+5:302021-05-30T07:16:36+5:30

मेट्रो सुरू झाल्यानंतर त्याचे जाळे विस्तारणार आहे. साहजिकच मुंबईची कनेक्टीव्हिटी आणखी वाढेल. उपनगर जवळ येईल. यामुळे प्रवास सुखकर होतानाच ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी व्यक्त केला आहे. 

Mumbai in minutes dream will come true metro network will make travel superfast | मुंबई इन मिनिट्स’ स्वप्न प्रत्यक्षात येणार; मेट्रोच्या जाळ्यामुळे प्रवास सुपरफास्ट होणार

मुंबई इन मिनिट्स’ स्वप्न प्रत्यक्षात येणार; मेट्रोच्या जाळ्यामुळे प्रवास सुपरफास्ट होणार

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : पश्चिम उपनगरात येत्या ऑक्टोबरमध्ये मेट्रो २अ आणि मेट्रो ७ सुरू होणार आहे. सध्या दोन मेट्रोमध्ये अर्धा तासाचे अंतर असेल. मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर त्याचे जाळे विस्तारणार आहे. साहजिकच मुंबईची कनेक्टीव्हिटी आणखी वाढेल. उपनगर जवळ येईल. यामुळे प्रवास सुखकर होतानाच ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी व्यक्त केला आहे. 

प्रश्न - प्रकल्पाचा प्रवास कसा झाला; कोरोनाचा फटका बसला का?
ऑक्टोबर २०१५ साली कामाला मंजुरी मिळाल्यानंतर ११ ऑक्टोबर २०१५ साली प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. मे २०१६ साली प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली. २०२० साली चारकोप डेपो तयार झाला. दोन्ही मेट्रोची एकूण लांबी ३५.१ किमी आहे. मेट्रो २ अ मार्ग १८.६० किमी तर मेट्रो ७ हा मार्ग १६.५ किमी लांब आहे. कोरोनामुळे दीड वर्षांपासून कामाला फटका बसला. तरीही काम सुरू ठेवत वेगाने पूर्ण केले. मेट्रो-२ अ मार्गावर दहीसरपासून कामराज नगर २० कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गावर चार महिने चाचणी घेतली जाईल. तांत्रिक बाजूही तपासल्या जातील. रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर येत्या ऑक्टोबरमध्ये मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

प्रकल्पाचा खर्च किती, इतर प्रकल्प कोणते ?
मेट्रो प्रकल्पांसाठी सुमारे १२ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. आतापर्यंत ६ हजार कोटी खर्च झाले. कोरोनासह इतर घटकांचा परिणाम झाल्याने प्रकल्पास विलंब झाला असला तरी खर्च वाढणार नाही. २०२० आणि २०२१मध्ये कामात अनेक अडथळे आल्याने मार्चमध्ये होणारी चाचणी आता मे महिन्याच्या शेवटी होत आहे. मुंबई विमानातळावरील टर्मिनल एक आणि दोनसाठीच्या आवश्यक भूमिगत मार्गांचे कामही प्राधिकरण करेल. याचा भूमिपूजन सोहळा सोमवारी आहे. भिवंडीतील राजनोली आणि कल्याणमधील दुर्गाडी पुलाचे उद्घाटनही सोमवारी केले जाईल.

मेट्रोची काय वैशिष्ट आहेत ?
मेक इन इंडियाअंतर्गत भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडने पहिल्यांदा स्वदेशी मेट्रो विकसित केली आहे. जी चालकविरहित आहे. मेट्रो पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. रिक्षा, टॅक्सी, लोकल आणि उर्वरित वाहतुकीवरील ताण कमी होईल. पर्यायाने मुंबईचा वेग वाढेल. मुंबईत सुरुवातीला चालकाची मदत घेतली जाईल. त्यानंतर चालकविरहित तंत्रावर आधारित मेट्रोवर भर दिला जाईल.

मेट्रोचे काय फायदे होणार आहेत?
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येईल. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वतुर्ळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज आहे. मेट्रोची प्रत्येक ट्रेन ६ कोचची आहे. कोचमध्ये ५२ प्रवाशांची बसण्याची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २,२८० आहे. मेट्राेेत ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी असून, प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येईल.

Web Title: Mumbai in minutes dream will come true metro network will make travel superfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो