Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:58 IST2026-01-13T12:58:09+5:302026-01-13T12:58:59+5:30
Youth Dies After Falling from Local Train: मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला असून नाहूर स्थानकाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
Mumbai Local Train Accident:मुंबई लोकलमधून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (११ जानेवारी २०२६) दुपारी नाहूर स्थानक परिसरात घडली. या घटनेनंतर लोकलमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मनीष बाळू लोखंडे असे या मृत प्रवाशाचे नाव असून, रविवारी दुपारी नाहूर स्थानक परिसरात लोकलमधून पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष लोखंडे हे मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये टेक्निशियन पदावर कार्यरत होते. दरम्यान, मनीष लोखंडे यांनी रविवारी कुर्ला स्थानकावरून बदलापूरकडे जाणारी लोकल पकडली होती. ब्लॉकमुळे गाड्या उशिराने धावत असल्याने लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. परिणामी, त्यांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागला. दुपारी १:५० च्या सुमारास लोकल नाहूर स्थानकाजवळ पोहोचली असता, मनीष यांचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली पडला.
लोकलमधून पडल्याने मनीष यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
प्रवाशांचा संताप
दर रविवारी रेल्वे रुळांच्या आणि सिग्नलच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. या ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडतो आणि स्थानकांवर प्रवाशांची अलोट गर्दी उसळते. याच ब्लॉकमुळे झालेल्या गर्दीमुळे मनीष यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मनीष यांचा मृत्यू रविवारच्या विस्कळीत नियोजनाचाच परिणाम आहे, असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.