Bus Accident: तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील अपघात घडला नाही?; ईलेक्ट्रिक बसबाबत तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:58 IST2024-12-10T10:56:30+5:302024-12-10T10:58:10+5:30
Mumbai Bus Accident News: ब्रेक फेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा बस चालकाने केला होता.

Bus Accident: तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील अपघात घडला नाही?; ईलेक्ट्रिक बसबाबत तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Kurla Bus Accident ( Marathi News ) : मुंबई शहरातील कुर्ला पश्चिम भागात काल रात्री ईलेक्ट्रिक बसला भीषण अपघात झाला. भरधाव बसने अनेकांना चिरडलं असून अपघातात आतापर्यंत ६ जण मृत्युमुखी पडले असून तब्बल ४९ जण जखमी झाले आहेत. बस अपघातानंतर पोलिसांनी चालक संजय मोरे (५०) याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ब्रेक फेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा आरोपी चालकाने केला होता. मात्र पोलीस तपासात याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे.
ईलेक्ट्रिक बस तज्ज्ञांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. अशा ईलेक्ट्रिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास बस जागीच थांबते. त्यामुळे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झालेला नाही, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आलेला आहे.
बेस्ट उपक्रमाने कोणती माहिती दिली?
बेस्ट उपक्रमाच्या माहितीनुसार, बस मार्ग क्रमांक ३३२ ही कुर्ला रेल्वे स्थानकावरून साकीनाका येथे जात होती. दरम्यान एल बी एस मार्गावर येताच बस ब्रेक एक्सीलरेट झाल्याने चालक संजय मोरे याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अपघात झाल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली आहे. बेस्ट बसच्या धडकेत दुचाकी, रिक्षा, इको व्हॅन,पोलीस जीप, टॅक्सी अशा वाहनांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त करत मदतीची घोषणा
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. "मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल आणि या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.