Kurla Bus Accident : "मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 15:36 IST2024-12-10T15:34:59+5:302024-12-10T15:36:59+5:30
Kurla Bus Accident : सोमवारी आफरीनच्या नवीन नोकरीचा पहिलाच दिवस होता. ती कामावरून परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.

Kurla Bus Accident : "मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो
कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बसचालक संजय मोरेला अटक केली आहे. मृतांमध्ये २० वर्षीय आफरीन शाहचाही समावेश आहे. सोमवारी आफरीनच्या नवीन नोकरीचा पहिलाच दिवस होता. ती कामावरून परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.
नोकरीचा पहिला दिवस आफरीनसाठी शेवटचा दिवस ठरला. याच दरम्यान आफरीनचे वडील अब्दुल सलीम शाह यांनी मुलीसोबत शेवटचं काय बोलणं झालं ते सांगितलं आहे. कामाचा पहिलाच दिवस असल्याने कामावरून घरी परतण्यासाठी रिक्षा शोधत असताना शाह आपल्या मुलीशी शेवटचं बोलले. शाह यांनी आफरीनला हायवेच्या दिशेने जाऊन रिक्षा पकडण्याचा सल्ला दिला होता. हाच त्यांच्यातला शेवटचा संवाद झाला.
"आफरीनच्या नोकरीचा पहिला दिवस होता. काम संपवून ती कुर्ला रेल्वे स्टेशनवर पोहोचली, तिथून तिने मला ९.०९ वाजता फोन केला आणि मला सांगितलं की, तिला शिवाजी नगरसाठी रिक्षा मिळत नाही. मी तिला सांगितलं, हायवेवर जा आणि तिथून रिक्षा पकड. मात्र ९.५४ वाजता मला माझ्या मुलीच्या नंबरवरून फोन आला. हा कॉल भाभा रुग्णालयाच्या एका स्टाफने केला होता. रुग्णालयात पोहोचलो तेव्हा आफरीनचा मृतदेह दिसला."
"परिसरातील लोकांना रस्त्यावरून चालता येत नाही. वर्षानुवर्षे परिस्थिती बदललेली नाही. बेकायदा पार्किंग, हातगाड्या, मेट्रोचं काम आणि इतर बेकायदेशीर कामांमुळे या ठिकाणी खूप गर्दी असते. या समस्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी" असं आफरीनचे वडील अब्दुल सलीम शाह यांनी म्हटलं आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा आरोपी चालकाने केला आहे. मात्र इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. दुसरीकडे, या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कुर्ला बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री ९.४५ च्या सुमारास कोणी कामावर जात होतं तर कोणी कामावरून घरी परतत होतं. मात्र त्याठिकाणी मृत्यू दबा धरुन बसला आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. या अपघातामध्ये ५५ वर्षीय कनीज फातिमा अन्सारी यांचा मृत्यू झाला असून त्या एका रुग्णालयात कामाला होत्या. सोमवारी त्यांची रात्रपाळी होती म्हणून त्या कामावर निघाल्या होत्या. मात्र त्यावेळी भरधाव बसने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.