"राज्यपाल गोव्याला मजा मारायला गेले", शेतकरी नेत्यांनी सर्वांसमक्ष निवेदन फाडून टाकलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 17:16 IST2021-01-25T17:03:51+5:302021-01-25T17:16:36+5:30
नव्या कृषी कायद्यांना विरोध करत संयुक्त किसान सभेचा हजारो शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा मोर्चा आज मुंबईत दाखल झाला होता.

"राज्यपाल गोव्याला मजा मारायला गेले", शेतकरी नेत्यांनी सर्वांसमक्ष निवेदन फाडून टाकलं!
"राज्यपालांनी भेटीसाठी दुपारी चार वाजताची वेळ आम्हाला दिली होती. तरीही राज्यपाल वाटण्याच्या अक्षता दाखवत गोव्याला मजा मारायला गेले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गांभीर्य नसलेल्या राज्यपालांचा आम्ही निषेध करतो", असं म्हणत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी राज्यपालांना देण्यात येणारं निवेदन सर्वांसमक्ष फाडून निषेध व्यक्त केला आहे.
कंगनाला भेटायला वेळ असतो; पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही; पवारांचा राज्यपालांना टोला
नव्या कृषी कायद्यांना विरोध करत संयुक्त किसान सभेचा हजारो शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा मोर्चा आज मुंबईत दाखल झाला होता. आझाद मैदानावर सर्व शेतकरी नेते आणि राजकीय मंडळींची भाषणं झाल्यानंतर मोर्चा राजभवनाच्या दिशेने कूच करण्यासाठी निघाला. पण मेट्रो सिनेमाजवळ मुंबई पोलिसांनी मोर्चाला अडवलं आणि राजभवनावर जाण्यास मज्जाव केला. यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
फोटो: "मये कोरोनाचं नव्हं...शेती कायद्याचं भय", पोशिंद्यांची पायपीट अन् मुंबईचं मॅनेजमेंट
पोलिसांनी यावेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या अधिकऱ्यांना निवेदन देता येईल. राज्यपाल सध्या मुंबईत नाहीत, असं सांगितलं. यावर शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला. राज्यपालांना भेटण्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या २३ सदस्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी चर्चा करुन राज्यपालांना निवेदन न देण्याचं ठरवलं. यासोबतच इतरही महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी वेळ न देणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार
"शेतकरी आज पायपीट करत मुंबईत आले. राज्यपालांच्या माध्यमातून आम्ही दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठीच्या पाठिंब्याचं निवेदन राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्याची विनंत करणार होतो. पण राज्यपालांनी ऐनवेळी गोव्याला पळ काढला आहे. राज्यपालांची ही अशी चलाखी इतर राज्यात चालेल पण महाराष्ट्रात हे चालणार नाही. राज्यपालांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो", असं अजित नवले म्हणाले.
राज्यपालांऐवजी आता थेट राष्ट्रपतींना निवेदन देणार
महाराष्ट्राचे राज्यपाल भेटीसाठी उपलब्ध नसल्याने आता शेतकऱ्यांचं निवेदन थेट राष्ट्रपतींना देणार असल्याचं यावेळी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने जाहीर करण्यात आलं आहे. तत्पूर्वी, आज राज्यपालांना देण्यासाठी आणलेलं निवेदन अजित नवले, अशोक ढवळे, भाई जगताप, विद्या चव्हाण, सचिन सावंत इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत फाडून टाकण्यात आलं.
अदानी, अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार
देशातील केवळ दोन उद्योपतींच्या दबावामुळे हे नवे कृषी कायदे लागू केले जात आहेत. त्यामुळे या दोन्ही उद्योगसमूहांच्या उत्पादनांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची घोषणा आणि आवाहन यावेळी करण्यात आलं. "अदानी आणि अंबानींना धडा शिकवण्यासाठी आपल्याला लोकशाही मार्गानं त्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचं आवाहन मी करतो. जिओचे सिमकार्ड सर्वांनी इतर मोबाइल कंपन्यांमध्ये पोर्ट करुन घ्यावं. तसेच अदानी, अंबानींच्या पेट्रोल पंपांवर अजिबात इंधन भरू नये", असं अशोक ढवळे यावेळी म्हणाले.