मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:46 IST2025-05-14T12:44:03+5:302025-05-14T12:46:42+5:30
मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी मनपा प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदाही मुंबईत नालेसफाईला सुरुवात झाली आहे.

मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी मनपा प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदाही मुंबईत नालेसफाईला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी नालेसफाईची कामं केली जात आहेत. त्याची पाहणी देखील अधिकारी करत आहेत. पण ही नालेसफाई केवळ मोठ्या नाल्यांमध्येच होत असून लहान नाले दुर्लक्षित राहत असल्याचा आरोप मनसेनं केलं आहे. याची वस्तुस्थिती दाखवणारं एक अनोखं आंदोलन आज मनसेनं साकिनाक्यात केलं आहे.
साकिनाक्यात एक नाला कचऱ्यानं इतका तुडुंब भरला आहे की त्यात चक्क उभं राहून मनसे कार्यकर्ते व्हॉलीबॉल खेळले. चांदिवलीचे विधानसभा नेते महेंद्र भानुशाली यांनी आज साकिनाका येथील नाल्यात मनसे कार्यकर्त्यांसह व्हॉलीबॉल खेळून प्रतिकात्मक आंदोलन केलं. मनपाच्या ए वॉर्डकडून नालेसफाईकडे होत असल्याचा आरोप यावेळी भानुशाली यांनी केला.
"मुंबईतील नालेसफाईचा दावा अधिकारी करत आहेत. तर इथल्या नाल्याच्या साफसफाईची जबाबदारी अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून झटकत आहेत. त्यामुळे इथला चेंडू तिथे असा प्रकार अधिकाऱ्यांचा सुरू आहे. याचच प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्हाला नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळण्याची वेळ आली आहे. जर मनपा अधिकाऱ्यांनी यानंतरही या नाल्याची सफाई केली नाही. तर हा सगळा कचरा एल वॉर्ड कार्यालयात नेऊन टाकण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही", असा इशारा महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे.