Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:52 IST2025-10-27T14:51:24+5:302025-10-27T14:52:27+5:30
Mumbai Crime News: मुंबई लोकल खाली एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबीयांना आणि काम करत असलेल्या ठिकाणी मालकाला याबद्दल संकेत दिले होते. पण...

Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
Mumbai Local news: मुंबईतील अंधेरी उपनगरात एका ३० वर्षीय तरुणाने लोकल रेल्वेखाली आत्महत्या केली. सोमवारी ही घटना समोर आली असून, भावेश शिंदे असे मयत तरुणाचे नाव आहे. अंधेरी पोलिसांनी भावेशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
या घटनेबद्दल जी माहिती मिळाली आहे त्यानुसार, मयत भावेश शिंदे हा जोगेश्वर पूर्वमधील मोगरापाडा येथे राहत होता. जोगेश्वर पूर्वमध्येच असलेल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये तो कामाला होता.
मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या
भावेश शिंदे सकाळी ७.३० वाजता घरातून बाहेर पडला होता. कामावर जात आहे, असे त्याने कुटुंबियांना सांगितले. सकाळी १० वाजताच्या दरम्यान तो रेल्वे रुळावर जाऊन पडला. त्यांच्या अंगावरून भरधाव लोकल केली, ज्यात त्याच्या मृतदेहाच्या चिंधड्या उडल्या. छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना त्याचा मृतदेह मिळाला.
अंधेरी रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी या घटनेबद्दल सांगितले की, मृत भावेश शिंदेच्या कुटुंबातील व्यक्तीचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्याने आत्महत्या का केली? याबद्दल अद्याप स्पष्ट कारण कळू शकलेले नाही.
घटनास्थळी भावेश शिंदेचा मोबाईल मिळाला आहे. मोबाईलची तपासणी केली जात आहे. तो जिथे काम करत होता तेथील मालकाचे आणि मित्रांचेही जबाब नोंदवले जात आहेत. अचानक आलेल्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
माझे शेवटचे दिवस जवळ आले आहेत
पोलिसांनी त्याचे कुटुंबीय आणि इतरांची चौकशी केली. त्यात त्यांनी सांगितले की, भावेश आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी म्हणाला होता की, माझे शेवटचे दिवस जवळ आले आहेत. मला सर्व नातेवाईकांना भेटायचे आहे. इतकंच नाही, तर मेडिकल मालकालाही तो म्हणाला होता की, २४ ऑक्टोबर हा माझ्या कामाचा शेवटचा दिवस असेल. पण, त्याच्या कुटुंबियांनी त्याचे बोलणं गांभीर्याने घेतले नाही. तो दारूच्या नशेत बोलत असावा असे त्यांना वाटले. त्यानंतर त्याने थेट आयुष्य संपवले.