Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:14 IST2025-06-20T15:13:00+5:302025-06-20T15:14:54+5:30

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ‘बालवाटिका आधारशीला’ अभ्यासक्रम लागू केला आहे.

Mumbai: Children's education in trouble due to vacant seats | Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत

Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ‘बालवाटिका आधारशीला’ अभ्यासक्रम लागू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण सुरू आहे. मात्र, राज्यातील हजारो अंगणवाडी केंद्रांत सेविकांच्या व मदतनीसांच्या रिक्त जागांमुळे शिक्षण व्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा  योजनेच्या ताज्या अहवालानुसार राज्यात सध्या तीन हजार ९२७ अंगणवाडी सेविका, १४ हजार २७० मदतनीस, ३१७  बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) आणि एक हजार ३६९ सुपरवायझर यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांतील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अवघड झाले आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. नवीन अभ्यासक्रमात बालकांच्या बौद्धिक, सामाजिक, भाषिक व भावनिक विकासावर भर दिला जात आहे. परंतु, शिक्षक व साहाय्यकांच्या कमतरतेमुळे हे उद्दिष्ट गाठणे कठीण ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

... अन्यथा बालवाटिका संकल्पनेवरच गदा येण्याची शक्यता
तीन ते सहा वयोगटांमध्ये दर्जेदार अनौपचारिक शिक्षण मिळाल्यास बालकांची बुद्धी अत्यंत तल्लख होते. कौशल्य विकसित होतात. म्हणूनच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण दिले गेले. त्यामुळे सरकारने लवकर या रिक्त जागांची भरती केली पाहिजे, अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे. अन्यथा शिक्षणाचा पाया असलेल्या ‘बालवाटिका’ संकल्पनेवरच गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. 

"सेविका व मदतनीस यांचे रिक्त पदे व योजनाबाह्य कामांमुळे बालकांना दर्जेदार शिक्षण मिळेल का याची चिंता आहे. सरकारने याचा विचार करावा", महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ समन्वयक राजेश सिंग म्हणाले. "पुढील दोन ते तीन महिन्यांत सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू केली जाईल. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही", महाराष्ट्र एकात्मिक बालविकास योजना आयुक्त कैलास पगारे यांनी म्हटले आहे.

Web Title: Mumbai: Children's education in trouble due to vacant seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.