"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 22:44 IST2025-12-13T22:43:49+5:302025-12-13T22:44:22+5:30
वरळी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाहचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला.

"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Worli Hit & Run: २०२४ च्या मुंबई बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. शुक्रवारी, सुप्रीम कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळताना, या मुलांना धडा शिकवायला हवाच, अशी तीव्र टिप्पणी केली. या निर्णयामुळे मिहिर शाहला सध्या न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार असून, मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला जामीन नाकारण्याचा निर्णय कायम राहिला आहे.
सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका
न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठाने आरोपी मिहिर शाहच्या पार्श्वभूमीची दखल घेतली. शाह एका श्रीमंत कुटुंबातील असून, त्याचे वडील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाशी संबंधित असल्याचे न्यायालयाने यावेळी नमूद केले. "तो आपली मर्सिडीज शेडमध्ये पार्क करतो, बीएमडब्ल्यू बाहेर काढतो आणि ती क्रॅश करून पळून जातो. त्याला काही काळ आतच राहू द्या. या मुलांना धडा शिकवायला हवाच," असं सुप्रीम कोर्टाने म्हटले.
खंडपीठाने कठोर भूमिका घेत जामीन अर्ज ऐकण्यास नकार दिला. शाह यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रेबेका जॉन यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोर्टाचा कल लक्षात घेऊन त्यांनी अर्ज मागे घेण्याची परवानगी मागितली, जी न्यायालयाने मान्य केली.
नेमकं प्रकरण काय?
मिहिर शाह (२४) याला ९ जुल २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. त्याने मुंबईतील वरळी परिसरात आपल्या बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात कावेरी नाखवा (४५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले. अपघातानंतर मिहिर शाहने कार थांबवली नाही, उलट त्याने वांद्रे-वरळी सी लिंकच्या दिशेने वेगाने कार पळवली. धडकेमुळे कावेरी नाखवा या कारच्या बोनेटवर अडकल्या आणि नंतर त्या १.५ किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत कारखाली चिरडत गेल्या असा तपास यंत्रणांचा आरोप आहे.
यावेळी कारमध्ये असलेला शाहचा चालक राजरिशी बिडावत याला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली होती. मिहिर शाह आणि त्याचा चालक दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
यापूर्वी जामीन का नाकारला?
मिहिर शाहने मुंबई उच्च न्यायालयाच्या २१ नोव्हेंबरच्या जामीन नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने जामीन नाकारताना काही गंभीर बाबी नोंदवल्या होत्या. आरोपी घटनेच्या वेळी अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच दुचाकीला धडक देऊन आणि पीडितेला गाडीखाली ओढूनही तो कार थांबवत नव्हता.
घटनेच्या वेळी आणि नंतरचे आरोपीचे वर्तन जामीन देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणारे नव्हते, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
उच्च न्यायालयाने नमूद केले होते की, शाहने चालकाशी सीटची अदलाबदल केली. अपघातानंतर वडिलांना फोन केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. हे कृत्य पुराव्यांशी छेडछाड करणारे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.