Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:37 IST2025-10-06T11:34:47+5:302025-10-06T11:37:00+5:30
Mumbai Best Bus Accident: मुंबईतील दादरमध्ये एका बेस्ट बसला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
Mumbai Accident Latest News: मुंबईतील दादर परिसरात एका भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर एका महिलेसह चार जण जखमी झाले आहेत. दादरमधील प्लाझा बस स्टॉपजवळ वेगात असलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलरने बेस्ट बस आणि इतर वाहनांना धडक दिली. या धडकेनंतर बस एका बाजूला झुकली आणि बस स्टॉपवर उभे असलेले प्रवासी जखमी झाले, तर एकाचा मृत्यू झाला.
बेस्ट बसच्या अपघाताची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षानगर आगारातील १६९ क्रमांकांची बस (MH01 DR4654) प्लाझा बस स्टॉपवर येताच ही घटना घडली.
टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली अन्...
बेस्ट बस वरळी डेपोमधून प्रतिक्षानगर आगाराकडे जात होती. बस प्लाझा बस स्टॉपजवळ येत असतानाच दादर टीटीकडून शिवाजी पार्कच्या दिशेने निघालेल्या २० आसनी टेम्पो ट्रॅव्हलर आली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या समोरील बाजूस उजव्या चाकावर जाऊन धडकली.
टेम्पो ट्रॅव्हलर इतकी वेगात होती की, बेस्ट बस डाव्या बाजूला ढकलली गेली. आणि स्टॉपवर उभ्या असलेल्या काही प्रवाशांना धडकली. यात एका पादचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
बेस्ट बस अपघात: मृत आणि जखमींची नावे
शाहाबुद्दीन (वय ३७) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर राहुल अशोक पडाले (वय ३०), अक्षय अशोक पडाले (वय २५) आणि विद्या राहुल मोते (वय २८) यांच्यासह चौघे जखमी झाले. सर्व जखमींना बस वाहक आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले.
टेम्पो ट्रॅव्हलरची इतर वाहनांनाही धडक
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलरने बेस्ट बसनंतर इतर वाहनांनाही धडक दिली. एक टॅक्सी आणि एका टुरिस्ट कारला टेम्पो ट्रॅव्हलर जाऊन धडकली. त्या वाहनांचेही नुकसान झाले. बेस्ट बसचा समोरील बाजूचा उजव्या चाकाचे टायर फुडले असून, समोरली काचही तुटली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.