मल्टिप्लेक्स चालकांकडून लुबाडणूक सुरूच; बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांना नो एंट्रीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 05:45 IST2018-08-03T05:45:59+5:302018-08-03T05:45:59+5:30
काही मल्टिप्लेक्सने २० ते ३० टक्क्यांनी किमती कमी केल्या असल्या, तरी चहा ६० रुपयांवर, समोसा ७० रुपयांना विकला जात आहे.

मल्टिप्लेक्स चालकांकडून लुबाडणूक सुरूच; बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थांना नो एंट्रीच
मुंबई/ठाणे/नवीमुंबई : मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे व फूड मॉलमध्ये पाणी, पॉपकॉर्न, वडा, समोसा अशा सर्वाधिक मागणी असलेल्या पदार्थांचे दर १ आॅगस्टपासून ५० रुपये ठेवण्याचे आपलेच आश्वासन मल्टिप्लेक्स चालकांनी पाळले नसल्याचे लोकमतच्या प्रतिनिधींनी मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबईत केलेल्या पाहणीत दिसून आले. काही मल्टिप्लेक्सने २० ते ३० टक्क्यांनी किमती कमी केल्या असल्या, तरी चहा ६० रुपयांवर, समोसा ७० रुपयांना विकला जात आहे. तसेच घरचे खाद्यपदार्थ नेऊ देण्याच्या परवानगीलाही बहुतांश चित्रपटगृहांनी हरताळ फासला असून असे पदार्थ प्रवेशद्वारावरच जमा करून प्रेक्षकांना आत सोडले जात आहे.
मुंबईच्या मल्टिप्लेक्समध्ये अशी स्थिती असतानाच ठाणे, कल्याण शहरांतील मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न, शीतपेये, पाण्याची बाटली, समोसे आदी खाद्यपदार्थांचे दर चढे असल्याचे दिसून आले. दर कमी करण्याचे आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, असा पवित्रा मल्टिप्लेक्सचालकांनी घेतला. पनवेलसह नवी मुंबईमधील मल्टिप्लेक्समध्येही अशीच ग्राहकांची लूट सुरू आहे. शीतपेयांसाठी १५० रुपये, पॉपकॉर्नसाठी १७० रुपये व पाण्याच्या बाटलीसाठी ६० रुपये दर आकारला
जात आहे. समोसा ५० ते ८० रुपयांना विकला जात आहे. काही मल्टिप्लेक्समध्ये घरची पाण्याची बाटली अपवाद म्हणून नेऊ दिली जात असली, तरी बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यावरील बंदी
कायम आहे.
मल्टिप्लेक्स चालकांच्या मनमानीबाबत मनसेने पहिले पाऊल उचलले होते. त्या वेळी त्यांनी
राज ठाकरेंची भेट घेऊन मनसेच्या सूचना अमलात आणण्याची ग्वाही दिली होती. मात्र अनेक चालकांनी किमतींमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. याविरोधात मनसे
६ आॅगस्टपासून मैदानात उतरणार आहे.
- संदीप देशपांडे, मनसे नेते
दराबाबत कोणताही आदेश आम्हाला अजून मिळालेला नाही. तसा आल्यास त्यानुसार बदल करण्यात येईल.
- परशुराम खांबे, व्यवस्थापक - नक्षत्र थिएटर्स