“राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:26 IST2025-01-08T12:23:09+5:302025-01-08T12:26:21+5:30

Sanjay Raut News: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावे जाहीर करावीत, असे आव्हान संजय राऊतांनी दिले आहे.

mp sanjay raut claims raj thackeray mns party was used to break balasaheb thackeray shiv sena | “राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका

“राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांनी मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका कधीही लागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार ठाकरे गट करत असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, नेते, पदाधिकारी उघडपणे नाराजी व्यक्त करून पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी यांसह अनेक कार्यकर्ते भाजपा, शिवसेना शिंदे गटात जात आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना पक्ष फोडाफोडीबाबत भाष्य केले. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत, तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवे आहे. पटेल यांना सांगितले गेले आहे की, खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की, तुम्हाला मंत्रिपद मिळेल. देशाला त्याचा काहीही उपयोग नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्री व्हायचे आहे. त्यामुळे फोडाफोडीचा प्रकार सुरू आहे, या शब्दांत संजय राऊतांनी महायुतीला सुनावले. 

राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला

राज ठाकरेंच्या मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे, तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे. हा वापर मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो आहे एवढेच मी सांगेन, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावे जाहीर करावीत. त्यांच्याकडे सत्ता आहे. दिल्लीत राक्षस बसले आहेत. ईडी, सीबीआय त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ही फोडाफोडी सुरू आहे. भाजपाला किती आमदार, किती खासदार पाहिजेत त्यांचे भवितव्य काय, असा थेट सवाल संजय राऊतांनी केला आहे. 

दरम्यान, शरद पवारांच्या आमदारांना, खासदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तरीही यात देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मुखवटे गळून पडत आहेत. या देशाच्या इतिहासात तुमची नोंद लोकशाहीचे वाट लावणारे लोक अशी होणार आहे, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
 

Web Title: mp sanjay raut claims raj thackeray mns party was used to break balasaheb thackeray shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.