मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनला परतीचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 18:44 IST2020-10-23T18:44:14+5:302020-10-23T18:44:42+5:30
Mumbai Monsoon : येत्या काही तासांत परतीचा मान्सून दाखल होणार

मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनला परतीचे वेध
मुंबई : तब्बल चार महिन्यांहून अधिक काळ मुंबईसह महाराष्ट्रात बसरलेल्या मान्सूनला आता परतीचे वेध लागले आहेत. राजस्थानातून परतीच्या मार्गाला लागलेला मान्सून आता गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, आसाममध्ये दाखल झाला असून, येत्या काही तासांत परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी बुधवारी रात्री बरसलेल्या पावसाने मुंबईकडे गुरुवारसह शुक्रवारीदेखील पाठ फिरवली. शुक्रवारी तर मुंबईभर रखरखीत ऊनं पडले होते. विशेषत: एकीकडे ऊनं तर दुसरीकडे ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबईकर हैराण झाले होते.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची नोंद झाली. मुंबईतही तुफान पाऊस पडला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर अरबी समुद्रात दाखल झालेला परतीचा मान्सून पुढे सरकला नव्हता. ६ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला होता. मात्र आता पुन्हा एकदा परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु झाला आहे. येत्या काही तासांत परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल होईल. आणि त्यानंतर त्याचा प्रवास दक्षिणेकडे सुरु होईल. दरम्यान, गेल्या २४ तासांपासून मुंबईसह लगतच्या परिसरात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने विश्रांती घेतली.