मॉडेल ते तरुण मुख्यमंत्री, संघाचे विश्वासू अन् प्रशासनावर पकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:16 IST2024-12-06T09:15:30+5:302024-12-06T09:16:15+5:30

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १३ दिवसांनी महाराष्ट्राला नवे सरकार मिळाले.  फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

Model to young chief minister, Sangh loyalist and grip on administration | मॉडेल ते तरुण मुख्यमंत्री, संघाचे विश्वासू अन् प्रशासनावर पकड

मॉडेल ते तरुण मुख्यमंत्री, संघाचे विश्वासू अन् प्रशासनावर पकड

मुंबईतील आझाद मैदानावरील शानदार सोहळ्यात गुरुवारी सायंकाळी आवाज घुमला.. ‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...’ अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १३ दिवसांनी महाराष्ट्राला नवे सरकार मिळाले.  फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. ते महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

नगरसेवक ते मुख्यमंत्री

नागपूर महापालिकेतून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय जीवनात पाय रोवले. अवघ्या २२ व्या वर्षी ते नगरसेवक झाले होते. सर्वात तरूण महापौर असल्याची नोंद फडणवीसांच्या नावावर आहे. नंतर ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही फडणवीस यांनी सांभाळले आहे. २०१४ ला वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कमी वयात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवारांनंतर ते दुसरे नेते ठरले. २०१९ ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.

    २०२२ पासून त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांची प्रशासनावर पकड आहे. भाजपच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासू नेत्यांच्या यादीत फडणवीस यांचा क्रमांक वरचा आहे.

फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाइलवर

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाइलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाइलवर दिले आहेत. कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्याची विनंती केली होती. गरीब रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड होऊ नये यासाठी फडणवीस यांनी मार्च २०१५ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला होता. या माध्यमातून अनेक गरजूंना उपचारासाठी मदत मिळणे सुरू झाले. आता तिसऱ्यांदा  मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा रुग्णसेवेचे काम केले.

राज्याला नव्या उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध

मुंबई : तमाम महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होऊन राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वचनबद्ध राहील, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला धन्यवाद दिले. मी महाराष्ट्रापुढे नतमस्तक आहे. महाराष्ट्राच्या आशीर्वादाने, मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

राज्यातील सर्व प्रश्नांची जाण असलेले, सर्व विषयांचा सखोल अभ्यास असलेले आजच्या पिढीतील नेते कोण, हा प्रश्न विचारला तर बहुतेक सगळ्यांचे उत्तर एकच असते आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. युती-आघाडीच्या काळात सलग पाच वर्षं मुख्यमंत्रिपद सांभाळणे हे साधे काम नाही. पण ही किमया त्यांनी करून दाखवली. त्यासोबत गृहखात्याचा अत्यंत कठीण कारभारही नेटाने सांभाळला. त्यानंतर, १०० हून जास्त जागा निवडून आणण्याचा पराक्रमही त्यांच्या नेतृत्वातच झाला. पुढे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. त्यांचे नेतृत्व इतर नेत्यांपेक्षा वेगळे कसे, हे पुढील पाच मुद्द्यांमधून लक्षात येते.

राज्याचे नेतृत्व करताना मुख्यमंत्रि‍पदावरील व्यक्तीला राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास केल्याने, फडणवीसांना चांद्यापासून बांद्यापर्यंतचे सगळे विषय माहीत होते-आहेत. अभ्यासू वृत्ती असल्याने आमदार असताना त्यांनी अनेक विषयांची, महाराष्ट्रातील प्रश्नांची सखोल माहिती मिळवली होती. शेतकरी-कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि मूलभूत सोयीसुविधांपासून ते मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीपर्यंत सर्व विषयांचे ज्ञान त्यांनी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून मिळवले आहे. त्यामुळेच राज्याचे आणि पक्षाचेही नेतृत्व करताना ते कुठल्याही प्रसंगी डगमगले नाहीत. विविध स्तरांतील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

जातीपातीचे राजकारण हा सध्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय झाला आहे. पण, फडणवीसांनी जात-पात न पाहता सर्व समाजघटकांसाठी काम केले. मग ती ओबीसी विकास मंत्रालयाची स्थापना असो किंवा मराठा आरक्षणाचा विषय. जात-पात-पंथ न पाहता ते विकासाचा मुद्दा घेऊनच पुढे चालत राहिले. आपली जात कोणती आणि समोरच्याची कोणती, असा विचार केल्याचे उदाहरण नाही. त्यापेक्षा ते जलसिंचन, ग्रामविकास, कृषी योजना, मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ या विषयांवर जास्त बोलल्याचे दिसते.

देशाला फाइव्ह ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा विषय असो किंवा ग्रामीण भागातील रोजगाराचा मुद्दा; दोन्ही विषयांचे ज्ञान आणि जाण फडणवीसांना आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात परदेशी गुंतवणूक आणण्याच्या कामात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री असतानाच नव्हे, तर उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी आपलं नेटवर्क वापरून अनेक परदेशी कंपन्या, उद्योग महाराष्ट्रात आणले.

सध्याचे राजकारण घराणेशाहीच्या भोवती फिरत असल्याचे चित्र दिसून येते. एकाच घरात २-२ पदे, आमदारकी, खासदारकी, मंत्रि‍पदे दिल्याचेही दिसून येते. राज्यातही अशी बरीच उदाहरणे आहेत. आपल्याच नात्यातील, परिवारातील व्यक्तीला मोठे करण्यासाठी प्रयत्न केले जाताहेत. पण इथेही फडणवीस वेगळे ठरतात. वयाच्या २२ व्या वर्षी सक्रिय राजकारणात आलेल्या फडणवीसांनी नगरसेवक, महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री इतकी महत्त्वाची पदे सांभाळली. पण, त्यांच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला लाभाचे पद दिल्याचे दिसत नाही. उलट, आपल्या कुटुंबातील कुणीही राजकारणात येणार नसल्याचेही ते सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदर्श मानूनच ते वाटचाल करत आहेत.

संघ विचारांच्या मुशीतून आलेले देवेंद्र फडणवीस यांची पक्षावरची निष्ठाही लक्षवेधी ठरते. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या ब्रीदवाक्याप्रमाने फडणवीसांनी कायम पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले. राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर पक्षाच्या सांगण्यावरून ते विरोधी पक्षनेते झालेच, पण पुढे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेण्याचा आदेशही फडणवीसांनी शिरसावंद्य मानला आणि कुठलीही तक्रार न करता हे पद सांभाळले. आजही ते स्वतःला भाजपचा सामान्य कार्यकर्ता मानतात आणि पक्ष सांगेल तेच यापुढेही करणार असल्याचे ठामपणे सांगतात.

Web Title: Model to young chief minister, Sangh loyalist and grip on administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.