Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:41 IST2025-08-11T10:39:32+5:302025-08-11T10:41:10+5:30

Mumbai Local Train Mobile Theft: टिटवाळा, आंबिवली, शहाड, वाशी या भागांत रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज

Mobile thieves gang terrorizes Mumbai local train passengers | Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

योगेश बिडवई
उप-वृत्तसंपादक

लोकलमध्ये कितीही गर्दी असू द्या मोबाइलवर काही ना काही पाहण्याची बऱ्याच जणांना सवय असते. बरं, ते पाहिलं नाही तर काही बिघडत नाही किंवा तो कामाचा भागही नसतो. ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर काही मेसेज पाठविणे. काही निरोप पाहायचे असतील ते समजू शकतो. त्याच्याही पुढे काही प्रवासी असतात. गर्दीमुळे दरवाजात धोकादायक प्रवास करण्याची वेळ आली, तर किमान त्यांनी काळजी घ्यावी. मात्र, दरवाज्यात लोंबकळत असतानाही त्यांच्या हातातील मोबाइल सुटत नाही. हेच बेफिकीर प्रवासी आता मोबाइलची चोरी करणाऱ्या फटका गँगचे सावज ठरत आहेत. लोकल आणि एक्स्प्रेसमधील दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल किंवा किमती सामान चोरण्यासाठी रेल्वे मार्गाजवळ दबा धरून बसलेल्या 'फटका गँग'ची सध्या दहशत आहे.

गेल्या आठवड्यात तपोवन तरुणाच्या हातातील मोबाइल चोरण्यासाठी शहाड आणि आंबिवलीदरम्यान दबा धरून बसलेल्या चोराने इराणी फाटा येथे रेल्वेची गती कमी झाल्यावर गौरव निकम (वय २२) या तरुणाच्या हातावर काठीचा फटका मारला. त्यात त्याचा मोबाइल, तर खाली पडलाच. मात्र, तोल जाऊन गौरवही खाली पडला. त्याचा डावा पाय रेल्वेच्या चाकाखाली येऊन तो गंभीर जखमी झाला. त्यानंतरही फटका गँगच्या अल्पवयीन चोराने त्याच्याकडील पैसे लुटून नेले. रेल्वे पोलिसांनी गौरवला रुग्णालयात दाखल केले आणि इराणी वस्तीतून चोराला पकडले.

दादरमधील एका बुक डेपोमध्ये कामास असलेल्या जगन जंगले या तरुणाचा मोबाइल चोरण्यासाठी कळव्याजवळ त्याच्या हातावर फटका गँगच्या चोराने काठी मारली होती. तोल जाऊन जगन लोकलमधून खाली पडला होता. मागील वर्षीच्या मे महिन्यातील या दुर्घटनेत दोन्ही पाय चाकांखाली आल्याने जगनला ते गमवावे लागले. दुर्घटनेच्या तीन महिने आधीच त्याचे लग्न झाले होते.

मुंबईहून कसारा, कर्जतला जाताना रेल्वेलगच्या काही ठिकाणच्या ठिकाणच्या वस्तीत फटका गँगचे चोर राहतात. ते रूळांजवळ दबा धरून बसतात. त्यांचा बंदोबस्त पोलिस करू शकलेले नाहीत. परवाच्या घटनेनंतर मध्य रेल्वेने यार्ड, ट्रॅक, उच्च गुन्हेगारी क्षेत्रे, अतिक्रमणाच्या प्रमुख ठिकाणांसह रेल्वे रुळांजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सतत गुन्हे घडणाऱ्या ७ ठिकाणांची निवड केली आहे. या चोरांमध्ये प्रामुख्याने गर्दुल्ले आणि नशेखोरांची संख्या अधिक आहे. हे गुन्हेगार उंच जागांवर लपून बसतात. धावत्या लोकलमध्ये दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारून मोबाइल हिसकावून घेतात.

टिटवाळा, आंबिवली, शहाड, वाशी या भागांत रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज आहे. पोलिसांनी रेल्वे रूळांना लागून असलेला झोपडपट्टीचा परिसर, तेथील गुन्हेगारांची अधिक माहिती घेण्याची गरज आहे. अन्यथा फटका गँगमुळे हात-पाय प्रवाशाला हातपाय गमावण्याची वेळ आली, तर तेवढ्यापुरती कारवाई करायची आणि पुन्हा नवा गुन्हा घडण्याची आणि त्यात प्रवासाचा बळी जाण्याची वाट पाहायची, हे सुरूच राहील. हे कुठेतरी थांबवायला हवे.
 

Web Title: Mobile thieves gang terrorizes Mumbai local train passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.