शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला

By रेश्मा शिवडेकर | Published: March 22, 2024 10:41 AM2024-03-22T10:41:15+5:302024-03-22T10:41:50+5:30

Raj Thackeray, MNS in Shivaji Park: आपली ताकद यावेळी दाखवून द्या, पक्षाकडून मिळाल्या सूचना

MNS will put up a huge show of power at Shivaji Park as party workers started working for Gudhipadwa Melava in Dadar Mumbai | शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला

शिवाजी पार्कात मनसे उभारणार शक्तिप्रदर्शनाची गुढी; मेळाव्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला

Raj Thackeray MNS in Shivaji Park Gudhipadwa Melava: रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुतीत सहभागी होण्याचे निमंत्रण भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून आल्यामुळे उत्साह संचारलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मेळाव्याला शिवसेना भवनापर्यंत गर्दी होईल, इतके कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमतील आणि अवघ्या महाराष्ट्राला मनसेच्या ताकदीचे दर्शन होईल, या दृष्टीने पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

उल्लेखनीय म्हणजे ९ एप्रिललाच गुढीपाडवा आला असून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा आकडा शुभ मानला जातो. त्यामुळे हा शुभशकुनच मानला जात आहे. भाजपने चर्चेकरिता दिल्लीला बोलावल्यानंतर राज्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भरणारा हा मेळावा पक्षाच्या शक्तिप्रदर्शनाची गुढी उभारणारा ठरणार का, याबाबत उत्सुकता आहे. या दिवशी होणारा मेळावा पक्षात प्राण फुंकणारा ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे काय संदेश देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

आपली ताकद यावेळी दाखवून द्या, अशा सूचना पक्षाकडून आल्याने मेळाव्याच्या आयोजनासाठी मनसेच्या मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिवसेना भवनपर्यंत गर्दी होईल इतके कार्यकर्ते मेळाव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर जमतील, अशी ग्वाही मुंबईतील एका मनसेच्या नेत्याने दिली.

  • इथले नेते अडचणीत

भाजपाशी युतीमुळे मनसेचा काही भागातील मतदार दुखावण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ जिथे मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार मनसेच्या पाठीशी आहेत, तिथल्या कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. तसेच, ज्या ठिकाणी शाकाहार-मांसाहाराच्या विषयावरून मनसेच्या नेत्यांनी रान उठवले अशा भागातील नेत्यांचीही अडचण होणार आहे.

  • जे राहिले ते कट्टर मनसैनिक

गेल्या काही दिवसात अनेकांनी पक्षांतरे केली. परंतु, मनसेतून कुणी फारसे पक्षांतर केलेले नाही. त्यामुळे आता जो कार्यकर्ता पक्षात आहे, तो कट्टर मनसैनिक आहे. तो राज ठाकरे यांच्या पाठीशीच उभा राहील, असे पुण्यातील एका मनसेच्या नेत्याने सांगितले. तर सत्तेत गेल्याने कामे होतात. त्यामुळे पक्षनेतृत्व जिथे सांगेल तिथे आपली ताकद लावू, अशी ग्वाही मुंबईतील एका नेत्याने दिली.

  • मनसेकडे राज्यातील सात टक्के मते

गेल्या विधानसभेत राज्यातील सात टक्के मते मनसेने घेतली होती. त्यामुळे विरोधकांनी घेतली नसली तरी सत्ताधाऱ्यांनी मनसेची दखल घेतली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांचा फटका विरोधकांना बसू शकतो. मनसेमुळे मुंबई, ठाण्यातील मराठी मतांना खिंडार पडू शकते. त्यामुळे आपले उत्तर भारतीय मतदार दुखावले जात असतानाही भाजपने मनसेला साथीला घ्यायचे ठरविले आहे.

दरवर्षी गुढीपाडव्याचा मेळावा आम्ही आयोजित करत असतो. पण यावेळी आणखी दणक्यात करू.
- संदीप देशपांडे,  सरचिटणीस, मनसे

 

Web Title: MNS will put up a huge show of power at Shivaji Park as party workers started working for Gudhipadwa Melava in Dadar Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.