MNS on Dilip Walse-Patil: “आम्हाला दम देण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी आधी कायद्याचं पालन करावं,”; मनसेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:15 IST2022-04-04T16:14:27+5:302022-04-04T16:15:54+5:30
MNS on Dilip Walse-Patil: असे धमकी देणारे खूप गृहमंत्री बघितले असून, त्यांना आम्ही भीक घालत नाही, असे प्रत्युत्तर मनेसेने दिले आहे.

MNS on Dilip Walse-Patil: “आम्हाला दम देण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी आधी कायद्याचं पालन करावं,”; मनसेचा पलटवार
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले. यावेळी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करत शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असे राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी यासंदर्भात कारवाईचा इशारा दिला होता. यावरून आता मनसेने पलटवार करत गृहमंत्र्यांना थेट आव्हान दिले आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गृहमंत्र्यांनी कायदा कसा राबावायचा हे शिकले पाहिजे. सन्माननीय दिलीप वळसे-पाटील यांना विनंती आहे की, जे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशाचे आधी पालन करा. न्यायालयाने भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिलेत त्याचे पालन करा मग आम्हाला धमक्या द्या. आम्ही आहोतच आम्ही कुठे जाणार आहोत. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला आहे.
असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले
असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले आहेत. आम्हाला त्यांचा फरक पडत नाही. आमची जी मागणी आहे ती कायद्याचे राज्य यावे, कायद्याचे पालन व्हावे ही आहे. त्याचा त्यांनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे. गृहमंत्र्यांनी आम्हाला दम देण्यापेक्षा कायद्याचं पालन करावं. सन्माननिय उच्च न्यायालयाने काय भूमिका घेतलीय की, भोंगे उतरले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला दम देणार, आमच्यावर कारवाई करणार. कारवाईला कोण महाराष्ट्र सैनिक घाबरत नाही, असे थेट आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले आहे.
दरम्यान, सामाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी म्हटले होते. तत्पूर्वी राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी कार्यालयाबाहेर भोंगे लावले. यानंतर मुंबई पोलिसांनी या नेत्यावर कारवाई करत भोंगे उतरवले आहे. पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्याला समज देऊन भोंगे काढले. तसेच ताब्यात घेऊन चिरागनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.