“दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे भाजपवाले आम्हाला बांधायला काय शिकवणार?”; मनसेचे सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 20:04 IST2023-07-25T19:52:16+5:302023-07-25T20:04:49+5:30
MNS VS BJP: एक टोल फुटला म्हणून टीका करणाऱ्या महाराष्ट्र भाजपचे तोंड मणिपूरमधल्या घटनांवर का बंद होते, अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली आहे.

“दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे भाजपवाले आम्हाला बांधायला काय शिकवणार?”; मनसेचे सडेतोड उत्तर
MNS VS BJP: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे राज्यभरातील विविध भागांचा दौरा करताना पाहायला मिळत आहेत. विविध बैठकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पक्षाला नवी उभारी देण्याचे प्रयत्न मनसेकडून केले जात आहेत. यातच समृद्धी महामार्गावरील टोलनाका तोडफोडी प्रकारानंतर भाजप आणि मनसे या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाक्यावर अमित ठाकरे यांना थांबवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर तोडफोड केली. त्या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणावरून भाजपने मनसे आणि अमित ठाकरे यांच्यावर टीका केली. भाजपच्या या टीकेमुळे मनसेकडून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे.
टोलनाका फोडणे हे राजकारण नाही, कधीतरी बांधायलाही शिका
अमित ठाकरे यांना या प्रकाराचा आसुरी आनंद झाला व मीडियासमोर ते खोटेही बोलले. टोलनाक्यावरील कर्मचारी केवळ त्यांची ड्युटी करत होते. त्यांची काहीही चूक नव्हती. हे जनसामान्यांचे सरकार आहे. इथे कोणत्याही एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत टोलनाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, या शब्दांत भाजपने अमित ठाकरेंवर हल्लाबोल केला.
दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे आम्हाला बांधायला काय शिकवणार?
यावर संदीप देशपांडे यांनी खरमरीत शब्दांत प्रत्युत्तर दिले. आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडणारे आम्हाला बांधायला काय शिकवणार? त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याऐवजी स्वत:चा पक्ष बांधावा. एक टोल फुटला म्हणून एवढी थोबाडे उघडणाऱ्या महाराष्ट्र भाजपचे थोबाड मणिपूरमधल्या घटनांवर का बंद होते? आता फक्त टोलनाक्याच्या कंत्राटदारांची दलाली करण्यासाठी हे बोलतायत का? याच भाजपने सत्तेत आल्यास टोलनाके बंद करण्याची घोषणा केली होती. ते आश्वासन ते विसरले का? असा सवाल करत, दादागिरीबद्दल भाजपने आम्हाला काही शिकवू नये. आम्हाला ती करताही येते आणि निभावताही येते, असे संदीप देशपांडे यांनी सुनावले.