हिंदी सक्तीच्या मुद्द्याने वातावरण ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. पण त्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड सुरू केली. मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे ताब्यात घेतलं. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा रोड-भाईंदरकडे निघाला आहे. जोपर्यंत तुम्ही मोर्चाची परवानगी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार" असं म्हटलं आहे. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की, आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो फक्त रूट बदलायला सांगत होतो. मला स्पष्टपणे सांगायचंय की, मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते. जो रूट बदलायचा विषय आहे तर घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते घोडबंदरला मोर्चा काढा."
"मीरा रोडमधील घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढतं का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. तुम्ही गुजराती लोकांनी परवानगी दिली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते. पण अशा खोट्या समजुती पसरवू नका. मला महाराष्ट्रातल्या लोकांचा फोन येत आहे, मी सरकारला ही कल्पना देऊ इच्छितो की, अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा रोड-भाईंदरकडे निघाला आहे. आता आम्हाला बघायचं आहे की किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात? आता हे आंदोलन जोपर्यंत तुम्ही मोर्चाची परवानगी देत नाही तोपर्यंत चालू राहणार" असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
मीरा भाईंदरमध्ये अमराठी भाषिकांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर म्हणून मनसेने मोर्चा काढण्याची घोषणा केली. आज हा मोर्चा निघणार आहे. पण पोलिसांची या मोर्चाला परवानगी नाही. मात्र तरीही मोर्चा काढणारच अशी भूमिका मनसे घेतली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावली होती. ते मोर्चामध्ये जाण्यास ठाम असल्यानंतर पहाटे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.