MNS Raj Thackeray: 'दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करू नये', मनसे नेत्याचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:41 IST2021-08-21T08:40:54+5:302021-08-21T08:41:51+5:30
MNS Raj Thackeray: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा वाद आता चिघळताना दिसत आहे.

MNS Raj Thackeray: 'दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करू नये', मनसे नेत्याचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
MNS Raj Thackeray: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा वाद आता चिघळताना दिसत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरे यांच्याविषयी बोलू नये. त्यांची तेवढी लायकी नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
"राष्ट्रवादी नाव असणारा पक्ष महाराष्ट्रात अतिशय संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून काही शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही आहेत", असं संदीप देशपांडे म्हणाले.
अमोल मिटकरींनी केली होती टीका
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याचं विधान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली. यात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. "राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करुन राष्ट्रद्रोह केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे", अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
"राज्यात ९९ सालापर्यंत पाहिलं तर त्याआधी जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला", असं राज ठाकरे म्हणाले होते. आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असंही राज ठाकरे म्हणाले होते.