'बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं'; आता मनसेनेही आक्रमक, भरला सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:30 PM2022-05-25T12:30:23+5:302022-05-25T12:39:23+5:30

मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांना इशारा दिला आहे.

MNS leader Vaibhav Khedekar has given a warning to BJP MP Brijbhushan Singh. | 'बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं'; आता मनसेनेही आक्रमक, भरला सज्जड दम

'बृजभूषण यांनी महाराष्ट्रात पाय ठेवून दाखवावं'; आता मनसेनेही आक्रमक, भरला सज्जड दम

googlenewsNext

मुंबई/रत्नागिरी- मनसेप्रमुखराज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना दिलेला इशारा यावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा अद्याप थंड होण्याचं नाव घेत नाही. 

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी मला एअरपोर्टवर वैगरे भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, असं बृजभूषण म्हणाले. तसेच उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे.

बृजभूषण यांच्या या पवित्र्यानंतर मनसेकडून गेल्या काही दिवसांपासून आक्रमक प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र आता मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी बृजभूषण यांना इशारा दिला आहे. बृजभूषण सिंह आगामी मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी बृजभूषण सिंह मुंबईत येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र  हिंदू असूनही हिंदूंना विरोध करणाऱ्या सुपारीबाज बृजभूषण यांनी शिवरायांच्या पवित्र मातीवर पाऊल ठेवून दाखवावे, त्यांची तंगडी हातात दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिला आहे. 

दरम्यान, मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, असं स्पष्टीकरण मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत दिलं होतं. 

रेल्वे भरतीच्या जागा महाराष्ट्रात, पण जाहिरात मात्र उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रात होती. भरतीसाठी उत्तर प्रदेशातून मुले आली होती. त्यांना विचारण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यातून राडा झाला, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

Web Title: MNS leader Vaibhav Khedekar has given a warning to BJP MP Brijbhushan Singh.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.