Join us  

'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 1:08 PM

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक न लढता राज्यभर अनेक सभा घेत मोदी सरकारवर टीका केली होती. राज ठाकरेंनी सर्व सभेत नरेंद्र मोदी यांचे काही व्हिडिओ दाखवत अनेक योजनांची पोलखोल केली होती. तसेच आता देखील मनसेने नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नरेंद्र मोदी यांचा एका सभेतला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की, आता पॅकेज घोषीत करण्याची एक फॅशन झाली आहे. आतापर्यत इतके आर्थिक पॅकेज जाहिर करण्यात आले आहे. मात्र तुम्हाला काही आतापर्यत काही मिळालं आहे का असा सवाल नरेंद्र मोदी सभेतील उपस्थित असणाऱ्या लोकांना विचारतात, असं या व्हिडिओमधून दिसून येत आहे. पॅकेज फक्त घोषित करण्यात येतं, मात्र हे लोकांपर्यंत पोहचत नाही, असं नरेंद्र मोदी या व्हिडिओमध्ये बोलत असल्याचे दिसून येत आहे. संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा पकडत कधी खरं बोलतात, कधी खोटं बोलतात समजतच नाही, असं म्हणत व्हिडिओ ट्विट केला आहे.

तत्पूर्वी, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. स्वावलंबी भारत असं या पॅकेजला नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घोषित केलेले २० लाख कोटी रुपये हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.

नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेनं स्वावलंबी भारताला गती मिळेल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. 

टॅग्स :राज ठाकरेनरेंद्र मोदीमनसेभाजपाभारतसंदीप देशपांडे