MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | 'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...'

'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...'

मुंबई: आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्यात्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मी त्याला पाहिलंय, त्याच्याशी बोललोय. एकवेळ त्याला दमसुद्धा दिला होता, असे विधान संजय राऊत यांनी पुण्यातील लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केले होते. संजय राऊत यांच्या या विधानावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे.

एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. आता अंडरवर्ल्डचं अस्तित्व काहीच राहिलं नाही, आधी कोण मुख्यमंत्री होणार, कोण सरकारमध्ये येणार हे अंडरवर्ल्ड ठरवायचे. अशा त्या काळात मी अंडरवर्ल्डच्या अनेक लोकांना पाहिलंय. मी दाऊदपासून सगळ्यांचे फोटो काढले आहेत. आज भारतात दाऊद इब्राहिमला पाहणारे त्याच्याशी बोललेले फार कमी लोक आहेत. मात्र मी  दाऊदला पाहिलंय, त्याच्याशी बोललोय. एकवेळ तर त्याला दमसुद्धा दिला होता,''असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी मुलाखतीमध्ये केला होता. यावर संजय राऊत एक नंबरचे फेकाडे आहेत. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आता त्यांच्याकडे काही काम उरलेले नाही. त्यामुळे प्रसिद्ध व चर्चेत राहण्यासाठी अशी फेकाफेक करत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय, संजय राऊत यांनी उघड केले गुपित

संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, दम बिर्याणी या नावाचे जनक संजय राऊत आहे. दाऊदला दम दिला म्हणणाऱ्या राऊत अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामध्ये देखील मध्यस्थी करु शकतात. संजय राऊत यांच्यासारखं महान व्यक्तीमत्व भारतात आहे हेच भारताचं नशीब असल्याचा टोला संदीप देशापांडे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन होण्यासाठी संजय राऊत यांचा वापर करुन घेतला. त्यामुळे आता संजय राऊत यांच्याकडे काही काम उरलं नसल्यामुळे अशा प्रकारचे विधान करुन माकडचेष्टा करत असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत यांना लोकप्रभामधून जर राज ठाकरेंनी सामनामध्ये आणले नसते तर कुठेतरी कारकुनी करत बसले असते असा टोला देखील संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. 

पाहा संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखतः

Web Title: MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.