बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 09:54 IST2025-08-18T09:53:47+5:302025-08-18T09:54:20+5:30

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत पैसे वाटले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

MNS leader Sandeep Deshpande alleged that money was being distributed in the BEST Patpedhi elections | बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप

Mumbai BEST Election:बेस्टच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक आज पार पडणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवत असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून ५ संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात उतरवण्यात आलं आहे. दरम्यान, निवडणुकीच्या २४ तास आधीच क्रेडिट सोसायटीला आर्थिक गुन्हे शाखेकडून २१ संचालकांना नोटीस देण्यात आली असून २४ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.  दुसरीकडे या निवडणुकीसाठी मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप मनसेकडून करण्यात आलाय.

बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २०२५ -२०३० या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक सोमवारी मुंबईत मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलसमोर महायुतीच्या नेत्यांनी सहकार समृद्धी पॅनेलला रिंगणात उतरवले आहे. चार वर्षांपासून रखडलेल्या बेस्ट पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून मंगळवारी त्याचा निकाल लागणार आहे. निवडणुकीला काही तास उरलेले असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समृद्धी पॅनलकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला. एका व्हिडीओमध्ये संदीप देशपांडे यांनी समृद्धी पॅनलच्या पॅम्प्लेटसोबत एक हजार रुपये देण्यात आल्याचे म्हटलं. याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

"आज बेस्ट पतपेढीची निवडणूक होणार आहे. अनेक पॅनल ही निवडणूक लढवत आहेत. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीने या निवडणुकीत राजकारण व्हायला सुरू झाले आहे. मतदारांना पैशाचे आम्हीच दाखवले जात आहे. त्यांच्याकडे घरोघरी पैसे पाठवले जात आहेत. काल आमचे सदस्य दत्तात्रय पेडणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचे पॅम्प्लेट आले. त्या पॅम्प्लेटच्या आत मध्ये एक लिफाफा होता. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या दोन नोटा सापडल्या. इतक्या घाणेरड्या पद्धतीने या निवडणुका लढवल्या जाणाऱ्या असतील तर याच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. यासंदर्भातील तक्रार आम्ही आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे करणार आहोत. बेस्टचे सगळे सदस्य सुज्ञ आहेत. अशा भुलथापांना, पैशांच्या आमिषांना ते बळी पडणार नाहीत. अशा पद्धतीने जे कोणी वागत असेल त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिडेच्या निवडणुकीत ठाकरे बंधु एकत्र आल्याने या निवडणूकीला महत्व आहे. ठाकरे गट आणि शिवसेना मनसेने एकत्र येऊन उत्कर्ष पॅनेल या निवडणूकीत उतरवले आहेत. तर ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे गटाचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृध्दी पॅनल निवडणुकीसाठी उभं केलं आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी ही निवडणूक होणार असून येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठीही ही महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: MNS leader Sandeep Deshpande alleged that money was being distributed in the BEST Patpedhi elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.