Join us

मनसे नेत्याचा राजेश टोपेंवर खोटेपणाचा आरोप; माफी मागून राजीनामा देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 20:01 IST

मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत राजेश टोपे यांनी केलेला दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई: राज्यातील सर्व जनतेला मोफत उपचाराची सुविधा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे केला होता. मात्र राजेश टोपेंच्या या दाव्यावर आता मनसेने आक्षेप घेतला आहे.

मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत राजेश टोपे यांनी केलेला दावा खोटा असल्याचा आरोप केला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये फसवणूक केली जात असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले आहे. तसेच गजानन काळे यांनी कोरोनाग्रस्त असलेल्या मित्राच्या मदतीसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या टोल फ्री क्रमांकावर केलेल्या कॉलची ऑडिओ क्लिप देखील ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. 

गजानन काळे पुढे म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजना ही कोरोना पेशंट व्हेंटिलेटरवर असेल तरच लागू पडते आणि अशा रुग्णांची संख्या एक ते दोन टक्क्यांच्या वर असत नाही. हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केल्यास हेच उत्तर दिले जाते की आपला रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच तुम्हाला ही योजना लागू आहे, असे शेकडो अनुभव राज्यातील जनतेला आले आहेत. 

तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (१५५३८८/ १८००२३३२२००) संपर्क केल्यास हीच माहिती मिळते. मग महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार कोरोनाबाधित रुग्ण संख्या असताना १ लाख २० हजार रुग्णांना या योजनेतून कसा लाभ मिळू शकेल असा प्रश्न  गजानन काळे यांनी केला आहे. राजेश टोपे खोटे बोलत आहेत आणि उल्लू बनवत आहेत, त्यासाठी त्यांनी एक तर या १ लाख २० हजार रुग्णांना मोफत उपचार दिल्याचे पुरावे सादर करावेत अथवा महाराष्ट्राची माफी मागून मंत्रीपदावर असताना खोटे बोललो म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील गजानन काळे यांनी केली आहे.

तत्पूर्वी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोनाकाळात कर्करोग, ह्रदयविकार, किडनी विकाराच्या तब्बल १ लाख ४१ हजार ५७८ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. तर सर्व रुग्णालयांमध्ये २५ जूनपर्यंत १ लाख ९८५ कोरोनाबाधिंतावर मोफत उपचार करण्यात आले. या काळात खासगी रुग्णालयात १८,२२८ तसेच केंद्र शासनाच्या, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या आरोग्य केंद्रात २,७७८ असे एकूण १ लाख २१ हजार ९९१ रुग्णांवर उपचार झाले आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सामान्य रुग्णांना जीवनदायी ठरत असून मोठ्या खर्चाचे वैद्यकीय उपचार तेही मोफत घेणे या योजनेमुळे शक्य झाल्याचे राजेश टोपेंनी सांगितले होते.

टॅग्स :मनसेराज ठाकरेराजेश टोपेसंदीप देशपांडेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस