MNS Bala Nandgaonkar: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठी माणसाची एकजूट ठेवा, असे राज ठाकरे म्हणाले, तेव्हाही सभागृह दणाणून गेले. कायमचे एकत्र येण्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळाले, पण तशी घोषणा करण्यात आली नाही. यानंतर या मेळाव्याबाबत राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीकडून केल्या जाणाऱ्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
राज यांचे भाषण आधी तर उद्धव यांचे भाषण नंतर झाले. उद्धव हे राज यांच्यापेक्षा जास्त वेळ बोलले. उद्धव ठाकरे यांनी शेवटी भावाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. भाषण संपतून राज आपल्या खुर्चीवर बसत असताना उद्धव यांनी त्यांना हात मिळविला आणि भाषण खूप छान झाल्याचे कौतुक हावभावांमधूनच केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित एकाच मंचावर पाहण्यासाठी हजारोंनी एकच गर्दी केली होती. यानंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि पांडुरंगाकडे एक मागणी केली आहे.
याचसाठी केला होता अट्टाहास
याचसाठी केला होता अट्टाहास. गेली २ दशके ज्या सुवर्ण क्षणाची वाट बघत होतो तो आज आला आणि कायमचा मनात घर करून गेला. बाळासाहेब आज जिथे असतील तिथून अतिशय आनंदाने बघत असतील. राजकीय इच्छा आणि महत्त्वाकांक्षा याच्या पलिकडे जाऊन मी हाच विचार घेऊन वाटचाल करत राहिलो की ठाकरे एकत्र दिसावे आणि आज मी याची देहा याची डोळा हे बघून सगळ्यात आनंदी झालो. त्यात आषाढीसारखा अतिशय पवित्र दिवशी हा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पांडुरंगाकडे एकच मागणे आहे जीवनात ही घडी अशीच राहू दे, असे बाळा नांदगावकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड आणि लहान मित्रपक्षांचे काही नेते उद्धव-राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित होते, पण काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. मराठी-हिंदीच्या वादात न पडण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसले. उद्धव-राज भविष्यातही एकत्र आले तर महाविकास आघाडी राहील का आणि त्यात काँग्रेस राहील का, हा विषय आता चर्चिला जात आहे.