KDMCप्रमाणे राज ठाकरे मुंबईतही लवचिक भूमिका घेणार का? बाळा नांदगावकरांचे मोठे विधान, म्हणाले…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:56 IST2026-01-23T14:53:03+5:302026-01-23T14:56:22+5:30
KDMC-BMC Election 2026: कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना आणि मनसे एकत्र आले आहेत.

KDMCप्रमाणे राज ठाकरे मुंबईतही लवचिक भूमिका घेणार का? बाळा नांदगावकरांचे मोठे विधान, म्हणाले…
KDMC-BMC Election 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना-भाजपा यांनी एकत्रित निवडणूक लढवली असली तरी निकालानंतर याठिकाणचे चित्र बदलले आहे. कल्याणमध्ये शिंदेसेनेचे ५३ आणि भाजपाचे ५० नगरसेवक निवडून आलेत. मात्र याठिकाणी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना आणि मनसे एकत्र आले आहेत. यावरून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण डोंबिवलीत सुरू असलेल्या घडामोडींबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या दृष्टीने विचार केला, तर माझ्या मनाला, स्वतःला ते पटत नाही. पटणार नाही. मी पटवून घेऊ शकत नाही. पण कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. आपण काही गोष्टी मनापासून घेतो,काही गोष्टी नाईलाजाने घेतो. या सगळ्या घटना घडत असतात. त्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्या आहेत? जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाही, तोपर्यंत त्या विषयावर मी बोलू शकत नाही, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वंदन करण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर आले होते.
KDMCप्रमाणे राज ठाकरे मुंबईतही लवचिक भूमिका घेणार का?
कल्याण डोंबिवली मनपाप्रमाणे राज ठाकरे मुंबईतही लवचिक भूमिका घेणार का? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला होता. लवचिकता ही वेळ प्रसंगी मराठी माणसाच्या हितासाठी घ्यावी लागते. राज ठाकरे त्याप्रमाणे भूमिका घेत असतात. याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही भाऊ समर्थ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे, यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते आपली भूमिका जाहीर करतील. तसेच कल्याण-डोंबिवलीच्या निर्णयाबाबत मी काहीही विधान करू शकत नाही. पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती झाली. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत असे राज ठाकरेंनी सांगितले होते. शिंदेसेनेचे ५३ आणि मनसेचे ५ असे मिळून एकूण संख्याबळ ५८ झाले आहे. याठिकाणी बहुमताचा आकडा ६२ असून शिंदेसेनेने सत्ता समीकरणात मनसेला सोबत घेतल्याने भाजपाला धक्का बसला आहे. आता पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदेंचा डाव उलथावून लावण्यासाठी भाजपानेही उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिल्याचे पुढे आले आहे. कल्याण डोंबिवलीत उद्धवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र यापैकी ४ नगरसेवक निकालापासून नॉट रिचेबल आहेत.