नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 17:45 IST2022-07-02T17:45:31+5:302022-07-02T17:45:38+5:30
अमित ठाकरे यांनी फेसबुकवर आरेमधील कारशेडच्या चर्चांवर पोस्ट केली आहे.

नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी
मुंबई- मेट्रो-३ चे कारशेड आरे वसाहतीतच उभारण्याचा निर्धार नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने पहिल्याच दिवशी व्यक्त केला. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. आरे येथे कारशेड उभारण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नाराजी दर्शवली आहे.
अमित ठाकरे यांनी फेसबुकवर आरेमधील कारशेडच्या चर्चांवर पोस्ट केली आहे. मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं, असं अमित ठाकरे म्हणाले.
आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्धवस्त झालं, तर भविण्यात राजकारण करायला माणून नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरे येथे कारशेड उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी न्यायालयीन परवानगीचे सोपस्कारही पार पाडण्यात आले होते. मात्र, पर्यावरणाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेने आरे येथील कारशेडला विरोध दर्शवला. त्यानंतर, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेड कामाला स्थगिती दिली. विशेष म्हणजे ठाकरे सरकारचा हा पहिला निर्णय होता. तेव्हापासून कारशेडचा मुद्दा अधांतरीच आहे.
प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत- एकनाथ शिंदे
जनतेच्या हिताचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी प्रयत्न आहे. जनतेच्या पैशांचा गैरवापर होता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचेच निर्णय हे युतीचे सरकार घेईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही योग्य तो निर्णय घेऊच- देवेंद्र फडणवीस
आरे येथील मेट्रो कारशेडसंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊच. उद्धव ठाकरे यांचा पूर्ण मान राखून मला असे वाटते की, आरे येथे कारशेड उभारणे हेच मुंबईकरांच्या हिताचे आहे. तिथे २५ टक्के काम झाले आहे. जिथे कारशेड २५ टक्के तयार झाले आहे तिथेच ते १०० टक्के तयार व्हावे, कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे. आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कारशेड हा अहंकाराचा विषय नाही तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.