BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 07:26 IST2025-11-17T07:23:23+5:302025-11-17T07:26:35+5:30
Maha Vikas Aghadi: मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय?
मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला उत्तर देताना, 'माझा पक्ष निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे', असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
उद्धव सेना आणि मनसेची जवळीक वाढल्यापासून मविआमध्ये विशेषतः काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मनसेबरोबर कुठल्याही निवडणुकीत युती करायची नाही ही भूमिका सुरुवातीपासून काँग्रेस मांडत आला आहे. त्यातच उद्धव सेना आणि मनसे हे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार हे स्पष्ट झाला आहे. महाविकास आघाडीची युती झाली तर काँग्रेसला राज ठाकरेंच्या मनसेबरोबर युती करावी लागेल, मात्र तेच काँग्रेसला मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसने निवडणुका घोषित होण्याच्या आधीच मुंबईत स्वबळाचा नारा दिला असून यामुळे मविआत फूट पडली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्वबळाची घोषणा केल्यानंतर मुंबई दिवसभर यावरूनच चर्चा सुरू झाली आहे.
उत्तर भारतीय व मुस्लिम मतदार दुरावण्याची भीती
काँग्रेसने स्वबळाचा नारा देताना थेट मनसेच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेली महाविकास आघाडी या सगळ्यामुळे महापालिका निवडणुकीत एकसंघ दिसणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईतील उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. जर मनसेसोबत युती झाली तर हा मतदारही आपल्यापासून दूर जाईल अशी भीती काँग्रेसला आहे. त्यामुळेच काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे.
समविचारी पक्षांशी युती
काँग्रेस समविचारी लहान पक्षांना मुंबईत सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहे. बिहार निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत काँग्रेसने युती केली होती. मुंबईतही समाजवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितसोबत नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसने युती केली आहे. मुंबईतही त्यांच्याशी काँग्रेस हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करेल.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"त्यांच्या घोषणेशी माझा काय संबंध, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे. त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. यावर मी काय जास्त बोलणार..?", असे उद्धव ठाकरे म्हणाले.
वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया
"आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. काही पक्ष सातत्याने मारहाण करून कायदा हातात घेण्याची भाषा करतात. ती भाषा आमच्या संस्कृतीला शोभणारी नाही. काही पक्षांची मारहाणाची आणि लोकांना त्रास देण्याची भूमिका आम्हाला मान्य नाही", असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.