मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:50 PM2020-06-22T14:50:34+5:302020-06-22T14:52:54+5:30

आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसून राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केली.

MNS delegation met Governor Bhagat Singh Koshyari over state various issue | मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन

मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन

Next

मुंबई – राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, सध्या राज्यात ५० हजाराहून अधिक सक्रीण रुग्ण आहेत तर एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. राज्यातील विविध मागण्यांसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात जाऊन भेट घेतली.

या भेटीत कोरोनामुळे सुमारे २५०० निवासी डॉक्टरांच्या रखडलेल्या (पदव्युत्तर डिग्री आणि डिप्लोमा) परीक्षा, परदेशांत अडकून पडलेले हजारो महाराष्ट्रीय बांधव आणि परप्रांतीय मजुरांची नोंदणी या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन दिले. निवासी डॉक्टर एकीकडे कोरोना रुग्णांसाठी लढत असताना दुसरीकडे त्यांच्यावर परीक्षेची (१५ जुलै) टांगती तलवार आहे. या परीक्षेबाबत विद्यार्थी-डॉक्टरांनी सुचवलेल्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी यावेळी राज्यपालांकडे केली. तसेच ७२ हजार आशा सेविकांना किमान १०,००० रु. मानधन तसंच इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत राज्यपालांची चर्चा केली.

तर "परप्रांतातून जे मजूर आता पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत, त्यांची आंतरराज्यीय स्थलांतर कायद्याद्वारे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना राज्यात घ्यावे आणि त्यादृष्टीने राज्य सरकारला आपण आदेश द्यावेत अशी मागणी मनसेचे नेते व आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली. त्याचसोबत आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसून राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केली.

इतर राज्यांना जर चार्टर विमानं मिळू शकतात, तर महाराष्ट्राला का नाही असा सवाल उपस्थित करत "महाराष्ट्रात येणा-या वंदे भारतच्या विमानांद्वारे महाराष्ट्रीय लोकांनाच प्राधान्याने महाराष्ट्रात परत आणायला हवं" असं मत शालिनी ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. आपण मांडलेले विषय महत्वाचे आहेत. मी त्यात लक्ष घालतो अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं. मनसेच्या शिष्टमंडळात मनसे नेते अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, उपाध्यक्षा दीपिका पवार आणि हर्षद पाटील यांचा समावेश होता.

Web Title: MNS delegation met Governor Bhagat Singh Koshyari over state various issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.