Join us  

दुष्काळासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 5:44 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याचं सांगितले जातंय.

मुंबई - महाराष्ट्रातील दुष्काळसंदर्भातमनसेच्या शिष्टमंडळाने मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये मनसेकडून दुष्काळग्रस्त भागात सरकारकडून उपाययोजना करावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

मागील काही दिवसांपासून शेतकरी प्रश्नांवर आक्रमक होण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचण्याचा मनसे प्रयत्न करत असल्याचं सांगितले जातंय. मागील आठवड्यात ठाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेने मोर्चा काढला होता. 

चंद्रकांत पाटील आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या भेटीमध्येही दुष्काळग्रस्त भागातील उपाययोजनाबाबत सूचना मांडण्यात आल्या. या मागण्या मंत्र्यांनी मान्य करत ताबोडतोब कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं. या बैठकीला मनसे शिष्टमंडळात नेते जयप्रकाश बाविस्कर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, संतोष नागरगोजे, बापू धोत्रे, विठ्ठल लोखंडकर, अशोक तावरे, अरविंद गावडे आदी उपस्थित होते.

मनसेकडून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या

  • दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार अंमलबजावणी करणे.
  • महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीमुळे गुरांना चारा छावणी तथा नागरिक व जनावरांना पाण्याची सोय येत्या ८ दिवसात करून देण्याचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणे.
  • दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • केंद्र सरकारच्या आदेशानुसार आलेल्या दुष्काळ निधीच्या विनियोगासाठी स्वतंत्र बँक खाते उघडून तालुकानिहाय केलेल्या खर्च हिशोबाची माहिती मिळावी. 
टॅग्स :दुष्काळमनसेचंद्रकांत पाटीलराज ठाकरेशेतकरी