Join us
Daily Top 2Weekly Top 5

“मुंबईकरांना खरेच ‘याची’ गरज आहे का?”; कोस्टल म्युझिकल रोडवरून अमित ठाकरेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 20:02 IST

Amit Thackeray On Coastal Road Jai Ho Musical Lane: ही मुंबईकरांची मागणी होती का? मराठी मातीतलं मराठमोळं गीत का नाही? मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? असे एकामागून एक अनेक प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

MNS Amit Raj Thackeray On Mumbai Coastal Road Musical Lane: कोस्टल रोडवर साकारण्यात आलेली संगीत रस्त्याची संकल्पना वाहनधारकांना आनंद देणारी आहे. हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित ही अभिनव संकल्पना यापुढेही राबविण्याचा मानस आहे, असे उद्‌गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तर, या संगीत मार्गाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. परंतु, यावरून आता मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत एकामागून एक प्रश्न केले आहेत. 

मुंबई महानगरपालिकेचा कोस्टल रोडवरचा 'म्युझिकल रोड'चा प्रयोग नक्कीच नवीन आहे, काहीतरी वेगळं आहे. तंत्रज्ञानाचा असा वापर केल्याबद्दल प्रशासनाचं अभिनंदन! पण मुंबईकरांना खरंच 'याची' गरज आहे का? ही मुंबईकरांची 'बेसिक' मागणी तरी होती का? रस्त्यांचे इतके महत्वाचे प्रश्न प्रलंबित ठेवून हा कसला अट्टाहास? असा सवाल अमित राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून केला आहे. 

आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही?

खरंतर कोस्टल रोड म्हणजे रोजच्या ट्राफिकच्या गोंगाटातून जरा शांतता! काही दिवस हे कुतूहल म्हणून ठीक वाटेल, पण रोजच्या प्रवाशांसाठी हा केवळ 'गोंगाट' ठरणार नाही का? तसेच, गाडी चालवताना ड्रायव्हरचं लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का? आणि बरं, काही वाजवायचंच होतं, तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही? आपल्या महाराष्ट्राची ओळख सांगणारं एखादं मराठमोळं गाणं का नाही? 'गर्जा महाराष्ट्र माझा' सारखं आपलं राज्यगीत किंवा स्वरसम्राज्ञी लता दीदींच्या अजरामर स्वरातील एखादं गाणं निवडलं असतं, तर अतिउत्तम झालं असतं!, असेही अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या गोष्टी नेहमी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'लाच का सांगाव्या लागतात?

हा रस्ता मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे! मुंबईच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात आपल्या मराठी मातीचा आणि संस्कृतीचा सूर उमटला असता, तर तो अनुभव प्रत्येक मराठी माणसासाठी अधिक अभिमानाचा ठरला असता. पण पुन्हा एकदा आपण आपली ओळख विसरलो. आणि महत्त्वाचा प्रश्न हा की, या गोष्टी नेहमी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'लाच का सांगाव्या लागतात? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून मराठी अस्मितेचा विचार का सुचत नाही? आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या सन्मानाची आठवण आम्हाला वारंवार सरकारला का करून द्यावी लागते? विकास हा व्हायलाच हवा, नवीन प्रयोगही घडायला हवेत; पण आपल्या संस्कृतीची जाण नसेल, तर तो विकास अपूर्ण आहे. त्यामुळे प्रयोग जरूर करा, पण ही कुणाची भूमी आहे आणि इथली संस्कृती काय आहे, याचं भान नक्की राखा!, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, कोस्टल रोडवर नरिमन पॉइंटकडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर साकारलेल्या संगीत मार्गाचे (मेलोडी रोड) लोकार्पण करण्यात आले. ताशी ६० ते ८० किमी वेगाने वाहन नेल्यास 'जय हो' या गीताची धून वाहनात बसून ऐकू येते. या रस्त्यावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात पट्टे बसविले आहेत. पट्ट्यांवरून वाहन या गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर 'जय हो' गाण्याची धून वाहनात बसलेल्या प्रवाशांना ऐकू येते. हंगेरी, जपान, संयुक्त अरब अमिराती येथे असे प्रयोग केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Coastal Road's Musical Lane: Amit Thackeray Questions its Necessity

Web Summary : Amit Thackeray questions the need for Mumbai's musical road, asking if it was a basic demand and why a Marathi song wasn't chosen. He emphasizes preserving cultural identity in development.
टॅग्स :अमित ठाकरेमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामुंबई कोस्टल रोडराज्य सरकारमहायुतीमहाराष्ट्र सरकार