‘एमएमआरचा जीडीपी ८० लाख कोटींवर जाणार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:06 IST2025-01-23T10:06:29+5:302025-01-23T10:06:59+5:30
MMRDA News: अटल सेतूमुळे उभी राहणारी तिसरी मुंबई आणि वाढवण बंदरामुळे उभी राहणारी चौथी मुंबई हे एमएमआरडीएसाठी आव्हान आणि संधीही आहे. एमएमआरडीएच्या आर्थिक आराखड्यानुसार २०२३ मध्ये मुंबई महानगराचा जीडीपी २५ लाख कोटी होता.

‘एमएमआरचा जीडीपी ८० लाख कोटींवर जाणार’
मुंबई - अटल सेतूमुळे उभी राहणारी तिसरी मुंबई आणि वाढवण बंदरामुळे उभी राहणारी चौथी मुंबई हे एमएमआरडीएसाठी आव्हान आणि संधीही आहे. एमएमआरडीएच्या आर्थिक आराखड्यानुसार २०२३ मध्ये मुंबई महानगराचा जीडीपी २५ लाख कोटी होता. २०४७ मध्ये हा जीडीपी ८० लाख कोटींवर जाणार आहे. या क्षेत्रात तेवढी क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
एमएमआरडीए स्थापनेच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे ‘उत्सव विकासाचा’ या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले...
देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यात एमएमआरडीएचे मोठे योगदान असेल. नीती आयोगाने एक ट्रिलियन डॉलर काय म्हणता तर या क्षेत्रात १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. एमएमआर हे क्षेत्र जगाचे आर्थिक सत्ता केंद्र होऊ शकते.
एमएमआरडीएचा सुवर्ण महोत्सव म्हणजे आधुनिक विकासाचा सुवर्णमहोत्सव आहे. येणाऱ्या पिढ्या एमएमआरडीएच्या कामाची फळे चाखणार आहे. पालिकेचे स्वायत्त अस्तित्व एमएमआरडीएमुळे धोक्यात येईल, अशी भीती वाटत होती. मात्र, एमएमआरडीएने स्वतंत्ररीत्या विकास साधला, असे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
उपस्थित होते.