सांग सांग भोलानाथ, नवाब मलिक कोणाचे..?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 07:24 AM2023-12-10T07:24:35+5:302023-12-10T07:25:34+5:30

भाजपने खरमरीत पत्र तर लिहिले.

MLA Nawab Malik sitting next to Ajit Pawar in the Legislative Assembly, accusations and rebuttals are going on | सांग सांग भोलानाथ, नवाब मलिक कोणाचे..?

सांग सांग भोलानाथ, नवाब मलिक कोणाचे..?

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

प्रिय सुनील तटकरेजी,

नमस्कार.

आपले पूर्वीचे सहकारी नवाब मलिक, (आता आपले सहकारी आहेत की नाही, माहिती नाही) अधिवेशनात अजितदादा यांच्या बाजूला जाऊन बसले. त्यावरून भाजपने खरमरीत पत्र तर लिहिलेच, शिवाय ते माध्यमांनाही दिले. भाजप किती पारदर्शकपणे वागतो, याची कल्पना आपल्याला आधी होती की नाही..? देवेंद्र फडणवीस मुरब्बी नेते आहेत. त्यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे आपल्या गोटात उडालेली अस्वस्थता अवघा महाराष्ट्र पाहत आहे. भाजपने ते पत्र माध्यमांकडे दिले नसते तर बरे झाले असते, अशी खंत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. यातच सगळे काही आले.

आपली नवाब मलिक यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे आपण सांगितले; पण मलिक तुमच्या बाजूला कसे काय येऊन बसत आहेत? याचा जाब तुम्ही मलिकांना विचारला पाहिजे. आमदारांची आसनव्यवस्था विधिमंडळ सचिवालय अध्यक्षांच्या सल्ल्यानुसार करते. मलिक यांचे आसन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठरवले का? ते कोणाच्या सल्ल्यावरून? की ठरवून तर... एकेकाळी याच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे प्रकरणावरून भाजपला भंडावून सोडले होते. समीर वानखेडे यांना पाचवेळा न्यायालयातून दिलासा मिळाला. त्यांच्याविषयी आता फारसे कोणी बोलत नाही; मात्र नवाब मलिक आपल्या बाजूला येऊन बसले की भाजपने आपल्यावर लेटरबॉम्ब टाकला. आपण देखील भाजपला पत्र लिहिले पाहिजे असे आपल्याला वाटत नाही का..? मलिक नेमके कोणाचे? हा प्रश्न नागपूर अधिवेशनात सुटेल का ?

मलिक यांना त्यांची भूमिका तर स्पष्ट करू द्या. त्यानंतर मी काय बोलायचे ते बोलेन, असे विधान आपले लाडके नेते अजितदादा यांनी केले आहे. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर अजितदादांच्या बाजूने सलग दोन दिवस येऊन बसले. हीच त्यांची भूमिका आहे, असे आपल्याला वाटत नाही का..? राजकारणात काही गोष्टी संकेताने तर काही गोष्टींसाठी डोळ्यांचे इशारे पुरेसे असतात. मलिक तर थेट तुमच्या बाजूला येऊन बसले. तरी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायचा आग्रह धरणे कितपत योग्य आहे..? मलिक जर काही बोलले आणि त्यातून आपल्याच लोकांची अडचण झाली तर..? असो. त्याचा विचार आपण केला असेलच.

आपले लाडके नेते अजितदादा हल्ली फारसे बोलत नाहीत. लोकांमध्ये मिसळत नाहीत. दिलेला शब्द पाळत नाहीत. कार्यक्रमाला येतो असे सांगून तेथे जातच नाहीत. अशा अनेक गोष्टी त्यांच्याविषयी सर्वत्र बोलल्या जात आहेत. आपल्याही कानावर या गोष्टी आल्या असतीलच. परवा भाजपचे एक नेते भेटले होते. नागपुरात संत्र्याचा ज्यूस पिता पिता ते म्हणाले, अजितदादांची आमच्या नेत्यांनी किती उत्तम सोय केली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची फाईल आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाते. त्यामुळे अजितदादांना आमच्या नेत्यांनी एकदम सेफ करून ठेवले आहे. उगाच एखादी फाईल निघाली आणि अडचण झाली तर... हा त्यामागचा विचार असल्याचेही ते सांगत होते.

दादांना भावी मुख्यमंत्री व्हायचे आहे. तेव्हा एवढी काळजी तर घ्यायलाच हवी, असेही ते म्हणाले. खरंच असं काही आहे का ? मात्र आपल्याच गटातील काही नेते दादांची कोंडी होत आहे, असे बोलत आहेत. दादांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काही बैठका घेतल्या. तेव्हा, तुम्ही अशा परस्पर बैठका घेऊ नका, असे मुख्यमंत्र्यांनी दादांना सांगितल्याची अफवा आहे. या अफवेचे कोणी खंडन केलेले नाही किंवा समर्थनही केलेले नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी दादांना रुसून बसावे लागते, तेव्हा त्या गोष्टी मिळतात. असा रुसवा किती वेळा आणि कशा-कशासाठी धरायचा? असा काळजीयुक्त स्वर आपल्याच गटाच्या एका नेत्याने राष्ट्रवादीचे दुसरे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर बोलून दाखवला. तेव्हा जयंतराव गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, दादांचा आक्रमकपणा ते आमच्या ऑफिसमध्ये सोडून गेले आहेत. तो त्यांनी कधीही येऊन घेऊन जावा... खरंच असे काही झाले आहे का..? नाहीतर नवाब मलिक यांना पाठवून तो आतल्या कपाटात ठेवलेला आक्रमकपणा आणायला लावायचा का..? जयंतरावांना मलिक आपले वाटतात. त्यामुळे ते विरोध करणार नाहीत. आपल्याला मलिक आपले वाटूनही आपले असल्याचे सांगता येत नाही. ही आपली राजकीय कोंडी आहे की घुसमट..? यावर आपण एक ट्विट करावे.

आम्हाला दादांना असे बघण्याची सवय नाही. दादा आक्रमकपणे भाष्य करतात. भूमिका घेतात. एखाद्याचे काम होणार नसेल तर होत नाही जा... असे ठणकावून सांगतात; मात्र त्यांना असे शांत शांत बघणे आम्हाला सहन होत नाही. ते कसे काय सहन करत असतील ते काकांनाच ठाऊक... या सगळ्या वातावरणावर आपण एक निवेदन काढले पाहिजे. आपल्यासोबत कोण-कोण आमदार आहेत, त्याची अधिकृत यादी अजूनही आपण कोणाला दिलेली नाही. त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे तुम्ही इकडच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्यासोबत कोण- कोण आहे, त्याची यादी जाहीर करून टाका. म्हणजे तिकडच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील त्यांची यादी जाहीर करतील. दोन्ही यादीतली जी नावे कॉमन असतील त्यांचे काय करायचे ? यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घ्यायचा का ? ते योग्य सल्ला देतात म्हणून सहज सुचवले. आपण अतिशय मुरब्बी राजकारणी आहात. त्यामुळे आम्ही कोण आपल्याला सांगणारे... पण राहावले नाही म्हणून पत्र लिहिले. यावर आपल्याला काय वाटते ते जरूर कळवा...

- तुमचाच, बाबूराव

Web Title: MLA Nawab Malik sitting next to Ajit Pawar in the Legislative Assembly, accusations and rebuttals are going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.