मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
By सीमा महांगडे | Updated: August 19, 2025 11:26 IST2025-08-19T11:24:21+5:302025-08-19T11:26:32+5:30
मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने वांद्रे-कुर्ला संकुलात पाणी भरण्याची चिन्हे आहेत.

मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
मुंबई : मिठी नदीची धोकादायक पातळी ३.४० मीटर असून नदीतील पाणी मंगळवारी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. मिठी नदीतील पाण्याची पातळी ३.२ मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे मिठी नदीलगत वास्तव्याला असलेल्या १४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने सुरू केले आहे. काल विहार तलाव ओसंडून वाहू लागल्याने मिठी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे परिसरात पुरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईत अतिमुसळधार पाऊस सुरू असून पवईतील विहार तलाव तुंडूब भरून वाहत आहे. विहार तलाव वाहू लागल्याने मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीची धोकादायक पातळी ३.४० मीटर आहे. मंगळवारी ही पातळी ३.२ मीटरवर पोहोचल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. त्यामुळे मिठी नदीलगतच्या १४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्याचेही गगराणी यांनी सांगितले.
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; १४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरु (कुर्ला क्रांतीनगर परिसर)#MumbaiRains#mithiriver#BMCpic.twitter.com/zH8WCwC4c2
— Lokmat (@lokmat) August 19, 2025
क्रांतीनगर आणि संदेश नगरमधील १४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याच्या सूचना रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. तर एनडीआरएफ आणि पालिकेची पथके क्रांतीनगर आणि संदेशनगर येथे दाखल झाली आहेत. १४० कुटुंबांना नजीकच्या मगनलाल नथूराम शाळेत स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर त्यांची खाण्या-पिण्याची योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास बीकेसी आणि वांद्रे परिसरात पाणी साचण्याचीही शक्यता आहे.