अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

By मनोहर कुंभेजकर | Published: May 18, 2024 08:18 AM2024-05-18T08:18:59+5:302024-05-18T08:21:55+5:30

या मतदारसंघातील सुमारे ३ लाख ४० हजार अल्पसंख्याक मतदार मतांचे दान टाकतात, हे पाहावे लागणार आहे.

minority votes will be decisive a fight between uddhav sena amol kirtikar and shinde sena ravindra waikar | अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात आहेत; मात्र मुख्य लढत उद्धवसेनेचे अमोल कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्यात होत आहे. दोघांच्याही प्रचारात रंगत वाढत असून, ‘ईडी’चे आरोप असलेल्या या उमेदवारांपैकी कोणाच्या पदरात या मतदारसंघातील सुमारे ३ लाख ४० हजार अल्पसंख्याक मतदार मतांचे दान टाकतात, हे पाहावे लागणार आहे.

मुंबई उत्तर पश्चिमेतील मावळते खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने उद्धवसेनेने त्यांचे पुत्र अमोल यांना उमेदवारी दिली. तर, दुसरीकडे वायकर यांनी मागील ३५ वर्षांत चारवेळा नगरसेवकपद आणि तीनवेळा आमदारकी भूषवली आहे. 

लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना दांडगा अनुभव आहे. ईडीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी १० मार्चला शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेसेनेने त्यांना रिंगणात उतरवले आहे. अमोल यांच्या प्रचारासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले. गोरेगावात सभा घेतली. कीर्तिकर यांनी मतदारसंघ पिंजून काढताना घरोघरी आपली निशाणी पोहोचवण्यावर भर दिला. त्यांच्या प्रचारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि इतर पक्ष सक्रिय आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वायकर यांच्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. गोरेगाव पूर्वेत त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा,  नागरी निवारा येथे महायुतीचा मेळावा घेतला. जोगेश्वरी व अंधेरी पूर्वमध्ये शक्तिप्रदर्शन करत रोड शो केला.

गाजत असलेले मुद्दे

दिवसेंदिवस वाढती वाहतूककोंडी.
‘आरे’च्या वनजमिनीवरील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा प्रश्न.
वर्सोवा कोळीवाड्याचे पुनर्वसन
वर्सोवा-लोखंडवाला परिसरात कायमचे टपाल कार्यालय
रखडलेल्या जुन्या इमारती व झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास
लोखंडवाला संकुल, सात बंगला, यारी रोड येथील अग्निशमन दलाची उभारणी 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

या लोकसभा मतदारसंघात वायकर यांच्यासह महायुतीचे चार आमदार असतानाही त्यांना उद्धवसेनेचे आव्हान आहे. आजवर सुमारे तीन लाख ३४ हजार अल्पसंख्याक मतदारांनी कायमच काँग्रेसलाच हात दिला आहे. उत्तर भारतीयांची सुमारे तीन लाख ६० हजार मते महाविकास आघाडी आणि महायुतीत वाटली गेली आहेत. मराठी मतदार सहा लाख आहेत. 

२०१९ मध्ये काय घडले ?

उमेदवार    पक्ष     प्राप्त मते
गजानन कीर्तिकर     शिवसेना  ५,७०,०६३
संजय निरुपम     काँग्रेस    ३,०९,७३५
सुरेश शेट्टी    वंचित      २३,३६७

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते    टक्के
२०१४    गजानन कीर्तिकर     शिवसेना     ४,६४,८२०    ५१.७७
२००९    गुरुदास कामत     काँग्रेस    २,१५,५३३    ३५.५
२००४     सुनील दत्त     काँग्रेस    ३,८५,७५५    ५१.५९
१९९९     सुनील दत्त     काँग्रेस    ३,६६,६६९    ५२.३५ 

 

Web Title: minority votes will be decisive a fight between uddhav sena amol kirtikar and shinde sena ravindra waikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.