Join us  

अधिवेशनापूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा?; पक्षाने निर्देश दिल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:46 AM

पक्षाने निर्देश दिल्याची चर्चा; भाजपतर्फे आज चक्का जाम, अधिवेशन रोखण्याचा इशारा

मुंबई : वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील टांगती तलवार कायम असून ते विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राठोड यांनी राजीनामा द्यावा, असे निर्देश त्यांना पक्षनेतृत्वाने दिल्याची माहिती आहे. राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारील चक्का जाम आंदोलन केले जाईल, असे भाजपने जाहीर केले आहे.

विरोधकांचा वाढता दबाव, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोजच्या रोज समोर येत असलेल्या बाबी लक्षात घेता राठोड यांचा पाय अधिक खोलात जात आहे. पूजा चव्हाण म्हणजेच पूजा राठोड होती आणि तिचा यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आत्महत्येच्या एक दिवस आधी गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच पूजाने आत्महत्या केली त्याच्या काही तास आधी संजय राठोड यांनी पूजाला ४५ कॉल्स केले होते, असा दावा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची वाट बघण्याची गरज नाही, ते राठोड यांची हकालपट्टी करू शकतात. राठोड राजीनामा देणार नाहीत तोवर आम्ही विधिमंडळ अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला.भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी, राठोड यांनी राजीनामा न दिल्यास २७ फेब्रुवारील राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

पूजाच्या आत्महत्येला आज १९ दिवस लोटले तरी पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज ज्यांचा आहे त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी केला. राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा, असे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांचे मत असून त्यांनी तशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविली असल्याची माहिती विश्वसनीय  सूत्रांनी दिली.

टॅग्स :संजय राठोडपूजा चव्हाणशिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारभाजपा