Join us

परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; वयोमर्यादाही झाली निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 15:15 IST

अर्ज करण्यास मुदतवाढ; ऑनलाईन अर्जही स्वीकारणार

मुंबई: अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'गुड न्युज' दिली आहे. ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, अशी अट भाजपा सरकारच्या काळात घालण्यात आली होती. ती आता दूर करण्यात आली आहे.

आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला, त्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी शिक्षण इतर शाखेचे असले तरी त्याला आता परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त त्याच बरोबर या योजनेतील वयोमर्यादेबाबतचा गोंधळही संपवला आहे.

मुळात भारतात सुद्धा 'विद्यापीठ अनुदान आयोगाच्या' नियमानुसार अनेक अभ्यासक्रमांना आंतरशाखीय प्रवेश दिला जातो. कला, वाणिज्य, विज्ञान आदी शाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दुसऱ्या विशिष्ट शाखेत प्रवेश दिला जातो. ही अट काढून टाकल्यामुळे आता पदवी आणि परदेशात प्रवेश मिळालेली ठराविक पदव्युत्तर शाखा वेगळी असली विद्यार्थी परदेश शिष्यवृत्तीस पात्र असतील.  या शिष्यवृत्ती साठी आता वयोमर्यादे संबंधीचा गोंधळही धनंजय मुंडेंनी संपवला असून, मूळ नियमानुसार पदव्युत्तर साठी ३५ वर्षे तर पीएचडी साठी ४० वर्षे अशी वयोमर्यादा आता निश्चित करण्यात आली आहे.

चालू शैक्षणिक वर्षासाठी समाज कल्याण आयुक्तालयामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत, १४ ऑगस्ट पर्यंत असलेली त्याची मुदतही वाढविण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन अर्ज दाखल करणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई - मेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारावेत असेही धनंजय मुंडे यांनी आयुक्तालयास निर्देशित केले आहे.

पदवी संदर्भातील अडसर दूर करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत घेण्यात आलेल्या या निर्णयाचे परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :धनंजय मुंडेमहाराष्ट्र सरकारशिक्षणविद्यार्थी