Join us

"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:46 IST

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule: शिवसेना ठाकरे गटाने हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुधाकर बडगुजर यांच्यासोबत माजी मंत्री बबनराव घोलप हे देखील भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. दुसरीकडे  सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपमधूनच जोरदार विरोध सुरु होता. आमदार सीमा हिरे यांनी बडगुजरांचा विरोध केला होता. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर नाशिकमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नाशिकमधील शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सकाळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशाबाबत काही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र दुपारी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावेळी चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी बडगुजर यांचा पक्ष प्रवेश आज होणार असल्याची कल्पना नव्हती असं स्पष्टीकरण दिलं.

"आम्ही सर्वांनी जेव्हा पक्षप्रवेशाची चर्चा केली तेव्हा गिरीश महाजन यांनी सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांच्यामुळे भाजप अजून मजबूत होऊन मोठा विजय मिळेल आणि नाशिकच्या भाजपच्या संघटनेला अधिक मजबुतीने पुढे जाता येईल असं सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विधानसभा निवडणुकीत दिलेला संकल्प पूर्ण करण्याचे काम करत आहे. भाजपमध्ये कुठलाही पक्षप्रवेश हा विकासासाठी होतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांनी पक्षप्रवेश केला आहे. मी पहाटे निघालो तेव्हा मला वाटलं की उद्या पक्षप्रवेश आहे. गिरीश महाजन यांनी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरवला. पक्षप्रवेश उद्या किंवा परवा होणार होता. पण आजचा दिवस चांगला असल्याने गिरीश महाजन यांनी आजच पक्षप्रवेश घेतला. त्यामुळे आम्हाला या पक्षप्रवेशासाठी येण्यासाठी उशीर झाला. माझी इच्छा होती की बाहेर मोठा स्टेज टाकून पक्षप्रवेश करावा," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. 

टॅग्स :चंद्रशेखर बावनकुळेभाजपानाशिकगिरीश महाजनदेवेंद्र फडणवीस