"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:59 IST2025-01-20T15:52:31+5:302025-01-20T15:59:02+5:30

सैफवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

Minister Ashish Shelar has responded to Aditya Thackeray criticism following the attack on Saif Ali Khan | "दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर

"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर

Ashish Shelar: बॉलिवुड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्रालयाला लक्ष्य केलं. सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला मुंबई पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात मोहम्मद शरीफुल हा बांगलादेशचा रहिवासी असल्याचे समोर आलं आहे. यावरुन आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला. या प्रकरणात रोहिंग्यांचा हात असेल तर गृहमंत्रालयाला प्रश्न विचारले पाहिजेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. यावरुनच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याच्याकडे भारतातील कोणतेही वैध भारतीय कागदपत्र नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो बांगालादेशमधून बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे म्हटलं आहे. यावरुनच आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकावर टीका केली होती.
“ही गंभीर बाब असून यात रोहिंग्यांचा सहभाग आढळला तर ते केंद्र सरकारचे अपयश आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे सरकार आहे आणि जर बांगलादेशी लोक देशात येत असतील तर त्यांची जबाबदारी आहे. तिसऱ्यांदा बहुमताने सरकार स्थापन झाले असून अशी घुसखोरी होत असेल तर केंद्र सरकारच्या भूमिकेवर आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न निर्माण होतो. हे केंद्र सरकारचे अपयश आहे की नाही हे स्पष्ट झाले पाहिजे. अशा घटना घडत असतील तर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

अभिनेते सैफ अली खान यांच्या घरी घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर ठाकरे गटाकडून भाजपला लक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार पलटवार केला आहे. बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिम पर्यंत आलेत वांद्रे पुर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही. म्हणून राजकीय स्वार्थासाठी सुरु असलेली भोंदूगिरी थांबवा, असा सल्ला  आशिष शेलार यांनी दिला आहे. 

"महाराष्ट्रात पहा चमत्कार. भोंदू हिंदुत्ववाद्यांचे ऐका नवे फुत्कार. बांग्लादेशी घुसखोर बांद्रयापर्यंत आले म्हणून उबाठाचे "छोटे आणि मोठे" आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या नावाने बोटं मोडत आहेत? वरुन आम्ही हिंदुत्व सोडले नाही म्हणून नेहमीच्या फुसक्या सोडायला पण विसरत नाही? सभेत दाखवण्यापुरते हातात रुद्राक्षांच्या माळा घालून फिरणाऱ्या महाराष्ट्रातील भोंदू, मतलबी, स्वार्थी हिंदुत्ववाद्यांना आमचा थेट सवाल आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

"भाजपाची सत्ता असलेल्या आसाम, त्रिपुरामधून घुसखोरी होत नाही. मग घुसखोरी कुठून होते? उबाठाच्या प्रिय दिदी ममता दीदींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगाल मधून बांग्लादेशीयांची घुसखोरी सुरु आहे. या राज्यात सीमा सुरक्षा दल तैनात  करण्यास दिदींचा विरोध आहे. उबाठा मग  तुमच्या प्रिय दिदींना का विचारत नाही घुसखोरी बद्दल?," असंही आशिष शेलार म्हणाले.
 

Web Title: Minister Ashish Shelar has responded to Aditya Thackeray criticism following the attack on Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.