'...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:28 IST2022-05-02T16:23:03+5:302022-05-02T16:28:38+5:30

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Minister and NCP leader Dhananjay Munde has criticized MNS chief Raj Thackeray | '...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान

'...तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागतच करु'; धनंजय मुंडे यांचं सूचक विधान

मुंबई: मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही. तो सामाजिक आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना मग आम्ही धर्मानेचं उत्तर देऊ, असा थेट इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी १ मे रोजी झालेल्या औरंगाबादच्या सभेत दिला.

राज ठाकरेंचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यानंतर राज यांनी आक्रमक पवित्रा घेतला. 'माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,' असं राज ठाकरे म्हणाले. तसेच नीट सांगितलेलं कळतच नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला होता. 

राज ठाकरेंच्या या विधानावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात आणि काय होऊन जाऊ द्यायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं धनंजय मुंडे म्हणाले. तसेच भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने देशातील बेरोजगारी संपणार आहे का किंवा महागाई कमी होणार आहे का? हे जर होणार असेल तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करु. मात्र तरुणांची माथी भडकवली तर एक पिढी उद्ध्वस्त होईल, असंही मुंडे यावेळी म्हणाले. 

प्रत्येक धर्मामध्ये आपापल्या परंपरा आणि प्रथा आहेत त्यामुळे त्याचा बाजार मांडण हे प्रगत महाराष्ट्राला परवडणारं नाही. भोंग्याचं भाडं बदललं की राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करतात. शरद पवार यांनी आपल्या हयातीमध्ये कधीही जातीपातीचे राजकारण केलं नाही. समाजातील सर्वच घटकांना सोबत घेऊन न्याय देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं. 

शरद पवार सोयीचे वाचतात- राज ठाकरे

मी त्यांना म्हणतो, तुम्हीदेखील त्यांची पुस्तके वाचा. परंतु पवार हे त्यांना जे सोयीचे आहे तेच वाचतात. जेम्स लेन आणि दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचा संबंध दाखवून मराठा समाजाची माथी भडकविण्याचे काम  पवारांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरे यांनी घराघरात पोहोचविले, परंतु ते ब्राह्मण असल्याने त्यांचा द्वेष केला, असे राज ठाकरे म्हणाले.

सध्या टिंगलटवाळी सुरू आहे- राज ठाकरे 

राज्यात समाजवाद, बुद्धीजम, हिंदुजम, कम्युनिजम विचार होता. सध्या टिंगलटवाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. देशाला विचारवंत, समाजसुधारक महाराष्ट्राने दिले. मात्र आज राज्याची अवस्था वाईट झालेली आहे. ही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर झाली आहे. 

Web Title: Minister and NCP leader Dhananjay Munde has criticized MNS chief Raj Thackeray