मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची दुरावस्था; शिवसेना आमदाराने चिखलात बसून केलं आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:31 PM2019-08-16T13:31:41+5:302019-08-16T13:32:49+5:30

शुक्रवारी शिवसेना आमदार तुकाराम काते आणि कार्यकर्त्यांनी एमएमआरडीएचा निषेध करत मानखुर्दमध्ये आंदोलन केले.

Metro works cause worst condition of road, Shiv Sena MLA protests in mud | मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची दुरावस्था; शिवसेना आमदाराने चिखलात बसून केलं आंदोलन 

मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची दुरावस्था; शिवसेना आमदाराने चिखलात बसून केलं आंदोलन 

Next

मुंबई - मेट्रो कारशेड कामामुळे मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्याची दुरावस्था झाली असून त्यांच्या निषेधार्थ अणुशक्तीनगरचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी आंदोलन केलं. हा रस्ता बांधून देण्याचं आश्वासन MMRDA प्रशासनाकडून अनेकदा देण्यात आलं आहे तसे असतानाही अद्याप लोकांनी होणाऱ्या त्रासाची दखल घेतली नाही असा आरोप तुकाराम काते यांनी केला आहे. 

शुक्रवारी शिवसेना आमदार तुकाराम काते आणि कार्यकर्त्यांनी एमएमआरडीएचा निषेध करत मानखुर्दमध्ये आंदोलन केले. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि चिखलामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होते. याबाबत अनेकदा स्थानिक आमदाराकडून पत्र व्यवहार करण्यात आले. हा रस्ता बांधून देण्याचं आश्वासनही मेट्रोकडून देण्यात आलं. मात्र आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने अखेर आमदार तुकाराम काते यांनी चिखलात बसून ठिय्या आंदोलन केले. 

मुंबईतील मानखुर्द परिसरात 100 एकर जागेवर मेट्रोचं कारशेड उभारण्याचं काम सुरु आहे. या कारशेडच्या कामामुळे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखल पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचं काम करा त्यानंतर कारशेड उभारा यासाठी स्थानिकांनी मेट्रोच्या कामाला विरोध केला होता. त्यावेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करुन देऊ असं लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अनेकदा यासाठी बैठका घेण्यात आल्या. स्थानिक खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली अशी माहिती तुकाराम काते यांनी दिली. 

यावेळी बोलताना तुकाराम काते म्हणाले की, MMRDA ने महाराष्ट्र नगरवर खूप अन्याय केला आहे. मेट्रोचं कारशेड करण्यासाठी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच या कामामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने महिलांना, मुलांना त्रास होतोय. वारंवार तक्रार करुनही प्रशासन दखल घेणार नाही. लोकांना होणारा त्रास मी स्वत:ही चिखलात बसून सहन केला. लोकांना न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे आंदोलन असेच सुरु राहील असा इशारा शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी एमएमआरडीए प्रशासनाला दिला आहे. 
 

Web Title: Metro works cause worst condition of road, Shiv Sena MLA protests in mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.