ही नावे म्हणजे भाजपचे कॉर्पोरेट हिंदुत्व; देव, दैवत व महापुरुषांचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:30 IST2025-10-29T13:30:30+5:302025-10-29T13:30:52+5:30
मेट्रो स्टेशनची नावे प्रायोजित करून प्रशासन पैसे कमवत आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

ही नावे म्हणजे भाजपचे कॉर्पोरेट हिंदुत्व; देव, दैवत व महापुरुषांचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप
मुंबई: सिद्धिविनायक मंदिर, काळबादेवी, महालक्ष्मी तसेच छत्रपती शिवाजी महाराज, आचार्य अत्रे यांच्या नावाने असलेल्या मेट्रो स्थानकांना कॉर्पोरेट कंपन्यांची नावे देऊन भाजपने कॉर्पोरेट हिंदुत्व आणले आहे. देव, दैवत व महापुरुषांचा हा अपमान आहे, असा आरोप करत मुंबई काँग्रेस अध्यक्षा तथा खा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनजवळ निदर्शने करण्यात आली.
मेट्रो स्टेशनची नावे प्रायोजित करून प्रशासन पैसे कमवत आहे, असे खा. गायकवाड म्हणाल्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बँकेचे नाव, आचार्य अत्रे चौकाला म्युच्युअल फंडाचे नाव देणे ही महाराष्ट्राच्या अभिमानाची खिल्ली उडवणे आहे. छत्रपतींचे नाव 'स्पॉन्सरशिप'वर विकता येत नाही, आचार्य अत्रेचा सन्मान 'ब्रँड डील'ने कधीच होऊ शकत नाही. गांधी आणि नेहरू या नावांची तर भाजपला अॅलर्जीच आहे, म्हणून नेहरू सायन्स सेंटर स्टेशनच्या नावातून नेहरू, तर संजय गांधी नॅशनल पार्कमधून संजय गांधी यांचे नाव वगळले आहे. आता हे सरकार काळबादेवी व शीतलादेवी स्टेशनच्या नावासाठी प्रायोजक शोधत आहे; तर विमानतळालाही कॉर्पोरेट कंपनीचे नाव जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही लढाई महाराष्ट्राचा सन्मान, स्वाभिमान व १३ कोटी जनतेच्या अस्मितेची आहे, असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
११ जण ताब्यात आणि सुटका
आंदोलन केल्याप्रकरणी खा. वर्षा गायकवाड, सचिन सावंत, प्रणिल नायर, सुरेशचंद्र राजहंस अशा एकूण ११ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काही वेळाने सोडून दिले.