मेट्रो चारचे कारशेडही कांजूरला ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 06:10 PM2020-10-23T18:10:31+5:302020-10-23T18:10:51+5:30

Mumbai Metro : स्थानिकांच्या विरोधामुळे एमएमआरडीएची चाचपणी

Metro four car shed also Kanjur? | मेट्रो चारचे कारशेडही कांजूरला ?

मेट्रो चारचे कारशेडही कांजूरला ?

Next

मुंबई : पर्यावरणाच्या मुद्यावर मेट्रो तीनचे कारशेड आरे काँलनीतून कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर स्थानिकांच्या विरोधामुळे रखडपट्टी सुरू असलेले वडाळा ठाणे- कासरवडवली या मेट्रो चार मार्गिकेचे मोगरपाडा (ठाणे) येथील कारशेडसुध्दा कांजूरमार्ग येथे हलवता येईल का, याबाबतची चाचपणी एमएमआरडीएने सुरू केली आहे.

वडाळ्याहून मुलुंड, ठाणे मार्गे कासरवडवली पर्यंत जाणारी मेट्रो चार आणि तिथून गायमुखपर्यंत विस्तार होणारी मेट्रो चार अ साठी ठाणे शहरात कारशेड उभारणीचे प्रयत्न २०१४ सालापासून सुरू आहेत. सुरवातीला त्यासाठी ओवळा येथे जागा प्रस्तावित होती. मात्र, स्थानिकांचा विरोध आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या मुद्यांवर ती रद्द करून मोगरपाडा येथील ४२ एकर जागेचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, तिथेही कारशेड उभारणीस स्थानिकांसह पर्यावरण प्रेमींचासुध्दा विरोध आहे. या ठिकाणी २०० एकर सरकारी जागा असून ती काही वर्षांपूर्वी स्थानिक भूमिपुत्रांना कसण्यासाठी देण्यात आली होती. त्याचे पोटहिस्से अद्याप झालेले नाही. या जागेची मोजणी केल्यानंतर त्यापैकी कोणती ४२ एकर जागा मेट्रो कारशेडसाठी संपादीत करावी लागेल याचा निर्णय होणार आहे. मात्र, स्थानिक शेतकरी या मोजणीलाच विरोध करत असून त्यांना राजकीय पाठबळसुध्दा आहे. या ठिकाणी कारशेड होऊ नये यासाठी बिल्डर लाँबीसुध्दा प्रयत्नशील असल्याचे आरोपही सातत्याने होत होते.   

स्थानिकांची समजून काढून मोजणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी मंत्रालयात अनेकदा बैठका झाल्या. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मेट्रो तीनच्या धर्तीवर मेट्रो चार आणि चार अ साठी आवश्यक असलेले कारशेडही कांजूरमार्गला स्थलांतरीत करता येईल का याबाबत चाचपणी सुरू केल्याची माहिती एमएमआरडीएतल्या वरिष्ठ अधिका-यांनी लोकमतशी बोलताना दिली. विशेष म्हणजे या कारशेडसाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात नसतानाही कारशेड उभारणीच्या कामाच्या निविदा एमएमआरडीएने आँगस्ट, २०२० मध्ये काढल्या होत्या. या जागी कारशेड भारणी केल्यास पर्यावरणाची हानी होईल की नाही हे तपासण्यासाठी इम्पँक्ट असेसमेंट रिपोर्टही तयार करण्यात आला असून तो एमएमआरडीएने नुकताच प्रसिध्दही केला आहे. कारशेड कांजूरला स्थलांतरीत झाल्यानंतर त्या सा-या प्रयत्नांवर पाणी फेरले जाणार आहे.

कांजूरचा पर्याय व्यवहार्य : कुलाबा ते सिप्झ (मेट्रो ३) आणि समर्थनगर ते विक्रोळी (मेट्रो – ६) या दोन मार्गिकांचे कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचे निश्चित झाले आहे. त्यांचा डिपीआर तयार करताना मेट्रो चारचे कारशेडही इथे उभारणे व्यवहार्य ठरेल का याची चाचपणी करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी १०२ एकर मोकळी जागा असून त्यासाठी कोणालाही मोबदला द्यावा लागणार नाही. त्यामुळे मेट्रो चारच्या कारशेड उभाऱणीच्या खर्चातही कपात होईल असे प्राधिकरणाचे मत आहे. भविष्यात कांजूरमार्ग – बदलापूर (मेट्रो -१४) मार्गिका उभारण्याचे प्रस्तावित असून त्यासाठीसुध्दा हे कारशेड पुरक ठरू शकते असे सांगण्यात आले.

Web Title: Metro four car shed also Kanjur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.