मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले, आशिष शेलारांची विरोधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 18:30 IST2017-08-21T15:23:50+5:302017-08-21T18:30:31+5:30
मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीतील निर्विवाद वर्चस्वानंतर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनीही शिवसेनेसह विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय

मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले, आशिष शेलारांची विरोधकांवर टीका
भाईंदर, दि. 21 - मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीतील निर्विवाद वर्चस्वानंतर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनीही शिवसेनेसह विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मीरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले. पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपाचा दणदणीत विजय करून स्वीकारले, असं म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. तसेच या विजयाबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
मुंबईत दमछाक उडाली, पालघर, कल्याण-डोंबिवलीत आमच्यामुळेच अडले, पनवेलमध्ये भोपळाही फोडता आला नाही. तर मीरा-भाईंदरमध्ये पाचव्यांदा मतदारांनी उघडे पाडले. काहींच्या ताकदीचा अस्सली चेहरा आता समोर आला असेल, असं म्हणत आशिष शेलारांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे.
मुंबईत दमछाक, पालघर,कल्याण-डोंबिवलीत अडले, पनवेलमधे भोपळा एमएमआरमधे पाचव्यांदा मतदारांनी उघडा केला "काहींच्या" ताकदीचा अस्सली चेहरा!
— ashish shelar (@ShelarAshish) August 21, 2017
मिरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले..पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपचा दणदणीत विजय करून स्विकारले! मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन! !
— ashish shelar (@ShelarAshish) August 21, 2017
भाजपाचा दबदबा कायम
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या लाटेनं इतर पक्षांचा सुपडा साफ केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. भाजपानं आतापर्यंत 54 जागांवर विजय मिळवला असून, मीरा-भाईंदर पालिकेत भाजपा स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तर शिवसेना 17, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवणं शक्य होणार आहे. मीरा- भाईंदर महापालिकेच्या 94 जागांपैकी 83 जागांचे निकाल हाती आले आहेत. मात्र हाती आलेल्या आकड्यांनुसार पुन्हा एकदा भाजपाच मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मोदी लाट इथेही कायम राहिली आहे.