Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 17:14 IST2025-10-23T16:38:04+5:302025-10-23T17:14:53+5:30
Mumbai Jogeshwari Fire Video: मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला जेएमएस बिझनेस सेंटर नावाच्या इमारतीत गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आग लागली.

Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला जेएमएस बिझनेस सेंटर नावाच्या इमारतीत गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. तोवर आगीने इमारतीचे चार मजले आपल्या कवेत घेतले होते. तीन मजले तर पूर्णपणे जळून खाक झाले होते. या आगीची थरारक दृश्य आता समोर आली आहेत. इमारतीतून धुराचे लोटच्या लोट बाहेर येत असताना दहाव्या मजल्यावर काही लोक अडकले होते. इमारतीच्या खिडकीतून ते मदतीसाठी ओरडत होते. आग पसरली तेव्हा आत जवळपास १७ ते १८ जण अडकले होते. या सर्वांची सुटका करण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दल वेळीच पोहोचल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, इमारतीला प्रशसानाकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेला नव्हता अशी माहिती समोर आली आहे. ओसी नसतानाही या १० मजली इमारतीत अनेक व्यावसायिक गाळे कसे काय सुरू होते? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याशिवाय इमारतीचं फायर ऑडिट देखील झालेलं नव्हतं असं सांगण्यात येत आहे. यातून पालिका प्रशासनाचं साफ दुर्लक्ष झाल्याचं उघड झालं आहे.
या इमारतीमध्ये हेल्थकेअर सेंटर, फिजीओथेरपी सेंटर, कोचिंग क्लासेस, डिझायनर क्लोथ सेंटर, CA ऑफिस असे एकूण ५० हून अधिक व्यावसायिक गाळे चालवले जात होते. सुदैवानं आज दिवाळीची सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी नव्हती. अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडली असती. स्थानिक शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
#WATCH | Maharashtra: People seen stranded on the top floor of JMS Business Centre in Jogeshwari West area of Mumbai where a massive fire has broken out. Fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/htbPRNz5nM
— ANI (@ANI) October 23, 2025
आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण इमारतीत व्यावसायिक गाळे आणि गोदामं मोठ्या प्रमाणावर असल्यानं आग वाढण्याची दाट शक्यता होती. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आलं. सध्या याठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.