Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 10:50 IST2025-09-02T10:50:12+5:302025-09-02T10:50:56+5:30
Manoj Jarange Patil on police notice: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान लवकरात लवकर रिक्त करा, अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसनंतर जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली.

Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
Manoj Jarange Latest news: "नियमांचं पालन करून आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी सुरूच राहणार. सरकारने आमच्याविरोधात न्यायालयात जाऊन अन्याय करण्याचा प्रयत्न केला, तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो. सगळ्या मागण्यांची (हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर) अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस दिली. त्यानंतर ते बोलत होते.
आझाद मैदाना मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून, आज पाचवा दिवस आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्यांनी मैदान न सोडण्याची भूमिका मांडली.
आम्ही रस्त्यावरील गाड्या हटवल्या
जरांगे म्हणाले, "गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आंदोलन करतोय. रात्री न्यायालयाच्या एका विषयावर आम्ही सांगितलं की, रोडवरील सर्व गाड्या काढा आणि मैदानात लावा. चार-पाच तासांत एकही गाडी रस्त्यावर ठेवली नाही. न्यायदेवतेच्या एका शब्दावर आम्ही जिथे ट्रॅफिक नाही, अशा ठिकाणी लावल्या आहेत", असे जरांगे यांनी सांगितले.
"सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी होणेही गरजेचे आहे. त्याला काय अडचणी आहेत, त्या आम्हाला सांगा. मराठा-कुणबी एक आहेत, यात काय अडचणी आहेत; तेही आम्हाला सांगा. सरसकट राज्यातील केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून गुन्हे दाखल करा", अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही -जरांगे
"बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी द्यावी. आतापर्यंत ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या नोंदी चिटकवून जागेवरच कुणबी प्रमाणपत्र वाटप करणे आवश्यक आहे. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, त्यांची वैधता तातडीने द्या. त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही", असेही जरांगे म्हणाले.
"शिंदे समितीला मुदतवाढ दिलीये, तर समितीने नोंदी शोधणं सुरूच ठेवलं पाहिजे. देवस्थानांचे दस्ताऐवज शोधले गेले नाहीत, तेही शिंदे समितीने शोधावेत. गोषवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातील नोंदी शोधणंही गरजेचं आहे. त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहेत. शिंदे समितीला तिचं स्वतंत्र कार्यालय असणं आवश्यक आहे, तेही दिलं जावं", असेही जरांग यावेळी म्हणाले.
"तुम्ही, सरकारने कितीही आम्हाला भिती दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही भीत नसतो. आमची मराठ्यांची औलाद आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही शांत आहोत; आम्हाला शांत राहू द्या. जे-जे बोलतो, ते-ते होतं असतं माझं. मराठे आणखी यायला सुरू झालेले नाहीत. शनिवारी, रविवार जर मराठे मुंबईला आले, तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळे ती मराठ्यांवर येऊ देऊ नका", असे मनोज जरांगे म्हणाले.
ते तुमच्यासाठी घातक ठरेल; जरांगे फडणवीसांना काय म्हणाले?
"आम्ही मुंबई सोडत नसतो. सोडणार नाही. आम्ही ठाम आहोत. तुम्ही काय कराल, शंभर पोलीस आले, तरी तुरुंगात नेतील. एक लाख फौजफाटा आला, तरी तुरुंगातच नेतील. आम्ही तुरुंगात उपोषण करू. पण, सुट्टी देणार नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल, असं वागू नका. मराठ्यांना इथून काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे. फडणवीस साहेब, ती रुतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानातून हुसकावून द्याल. तो जिव्हारी झालेला वार तुम्हाला महागात पडेल", असा इशाराही जरांगेंनी दिला.